ठाकरे शिवसेनेची कामगिरी लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे शिवसेनेची कामगिरी लक्षवेधी
ठाकरे शिवसेनेची कामगिरी लक्षवेधी

ठाकरे शिवसेनेची कामगिरी लक्षवेधी

sakal_logo
By

70673
देवगड ः येथील निवडणूक मतमोजणीवेळी झालेली गर्दी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

ठाकरे शिवसेनेची कामगिरी लक्षवेधी

देवगडमधील स्थिती; ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला दिली तगडी टक्कर

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाली असली तरीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या यशाकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. भले त्यांना द्वितीय स्थानावर रहावे लागले असले तरीही भाजपच्या उमेदवारांना त्यांनी दिलेली टक्कर लक्षवेधी होती. काही ग्रामपंचायती भाजपकडून हिसकावून घेण्यात त्यांना यश आले. माजी सभापती राहिलेल्या दोन गावांतील ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचाही प्रभाव दिसला नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांना याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता बनली आहे.
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्याने प्रत्यक्षात ३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. निकाल हाती आल्यानंतर अनेक ठिकाणी सरपंच निवडीमध्ये भाजपने आघाडी घेतली असली तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेले यश दुर्लक्ष करून चालणारे नाही. तसे पाहिले तर भाजपला मोठे यश मिळाले असले तरी त्यामध्ये आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मुळात देवगड तालुका सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तत्कालीन आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्यापासून तालुक्यात भाजपची पकड घट्ट झाली. भाजप पक्ष म्हटल्यावर आपोआपच तत्कालीन देवगड विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतले जाते. तब्बल तीन दशके येथे भाजपचा आमदार राहिला. त्यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद होतीच, त्यातच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार नीतेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची ताकद आणखीनच द्विगुणित होत त्याला ‘बुस्टर डोस’ मिळाला. राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यातील विरोधकांची धार बोथट होण्याची शक्यता मानली जात होती. पर्यायाने बहुतांशी सत्तास्थाने भाजपच्या अधिपत्याखाली येतील, असे चित्र निर्माण झाले होते. राणे यांचा काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसमधील काही जुने कार्यकर्ते, पदाधिकारीही भाजपवासी झाल्याने काँग्रेस विकलांग झाली. राष्ट्रवादीच्या वाढीलाही काहीशा मर्यादा होत्या. शिवसेना फुटीच्या आधी राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचा भाजप राजकीय शत्रुपक्ष बनला. त्यातच राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाल्यानंतर तालुक्यातही महाविकास आघाडीची चर्चा रंगू लागली; मात्र त्यातही तत्कालीन शिवसेना पक्षाची ताकद वरचढ होती. पुढे शिवसेना फुटल्यानंतर मूळ शिवसेनेला हादरा बसेल, अशी शक्यता वाटत असताना मध्यंतरी झालेल्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एका ठिकाणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला यश मिळाले, तर दुसर्‍या ठिकाणी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेला अधिक बळकटी आल्याचे चित्र आहे. पहिल्यापेक्षा ग्रामपंचायतीमध्ये त्यांची ताकद वाढली. मुळात भाजपच्या ताकदीला आमदार राणे यांच्या पक्ष प्रवेशामुळे ''बुस्टर डोस'' मिळाला असतानाही काही ठिकाणी पक्षाची पिछेहाट झाली. मणचे, हिंदळे, फणसे, खुडी येथील भाजपची सत्ता जाऊन तेथे ठाकरे गट शिवसेनेचा सरपंच निवडून आला. यातून दोन माजी सभापतींच्या गावातील ग्रामपंचायती शिवसेनेकडे गेल्याचे दिसते. त्यामुळे भाजपने आता जागरूक राहण्याची आवश्यकता बनली आहे. आता आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका येतील. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा वेध घेतल्यास भाजपला आता गाफील राहून चालणारे नाही. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ३३ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण १८ भाजप, ७ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, ६ गाव विकास पॅनेल, तर दोन अपक्ष अशी स्थिती आहे. शिवसेनेकडून ११, तर भाजपकडून २९ ग्रामपंचायतींवर दावा करण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी कितीही कांगावा केला तरी काही गाव पातळीवरील निवडणुका पक्षविरहित झाल्या आहेत. तसे पाहिले तर भाजपच्या वाढलेल्या ताकदीला ठाकरे गट शिवसेनेने लगाम घातला आहे. त्यामुळे भाजपने आनंद कुरवाळत बसण्यापेक्षा विरोधकांकडे ग्रामपंचायती कशा गेल्या, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
........................
चौकट
दाभोळे अपक्षाकडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून हिंदळे, खुडी, मणचे, नाद, पोंभुर्ले, विजयदुर्ग, फणसे, बुरंबावडे, ओंबळ, गवाणे, पाटगांव आदी ११ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. आपल्याकडे मणचे, हिंदळे, फणसे, खुडी या चार ग्रामपंचायती नव्याने आल्याचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी सांगितले. तर भाजपकडून चांदोशी, हडपीड, सांडवे, तोरसोळे, कुवळे, दहिबांव, किंजवडे, कोटकामते, मिठमुंबरी, नारिंग्रे, पोयरे, आरे, चाफेड, कट्टा, बापर्डे, विजयदुर्ग, गिर्ये, महाळुंगे, ओंबळ, पडेल, पेंढरी, सौंदाळे, उंडील, वाघिवरे-वेळगिवे, वाघोटण, गवाणे, गोवळ, कुणकवण, पाटगाव अशा एकूण २९ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. दाभोळे ग्रामपंचायतीवर अपक्षाने बाजी मारली आहे.
.........................
चौकट
शिंदे गटाचा प्रभाव नाहीच
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना जोर पकडत असताना येथे मात्र पक्षाला अजून उभारी मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून खासदारकीसाठी निवडणुकीत उतरायचे असल्यास संभाव्य उमेदवारांना संघटना बळकटीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. शिवसेना फुटली तरीही अद्याप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेच प्राबल्य असल्याचे निकालावरून दिसून येते.