चिपळूण ः नमुन्यांचा येतोय अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः नमुन्यांचा येतोय अहवाल
चिपळूण ः नमुन्यांचा येतोय अहवाल

चिपळूण ः नमुन्यांचा येतोय अहवाल

sakal_logo
By

बालके ठणठणीत तरीही
नमुन्यांचा अहवाल नाहीच
-
चिपळुणातील गोवर सर्व्हेक्षण ; गतिमान कारभाराची प्रचिती
चिपळूण, ता. २४ ः गोवरबाबत तालुक्यात झालेल्या सर्व्हेक्षणात ६ बालकांमध्ये लक्षणे दिसून आली होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान गेल्या १० दिवसात ही बालके ठणठणीत होऊ लागली तरी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. यावरून शासनाच्या गतीमान कारभाराची प्रचिती ग्रामस्थांना येऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी गोवर आजाराने राज्यभरात थैमान घातले होते. दिवसाला हजारो बालकांना गोवरची लागण होत होती. मात्र सध्या हे प्रमाण कमी झाले आहे. या आजराच्या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केले. सुरवातीला मुंबईतून शहरातील मापारी-मोहल्ला येथे आलेल्या ९ महिन्यांच्या बालकाला गोवरची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक अलर्ट झाल्यावर संपूर्ण तालुक्यात सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात ६ बालकांना लक्षणे दिसून आली होती. त्यांचे युरीन व अन्य नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
या बालकांना लक्षणे दिसून आल्यापासून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते. सध्या ही बालके बरी होत आली आहेत. असे असताना त्यांचे अहवाल न आल्याने शासनाचा कारभार किती गतिमान आहे हे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असताना प्रयोग शाळेत दिवसाला हजारो नमुने येत असल्याने उशिर झाला असावा, असे सांगतानाच आम्ही या बालकांना गोवर आजार आहे की नाही यापेक्षा अन्य बालकांना लक्षणेही दिसून येऊ नयेत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले.

चौकट
डोस चुकलेल्यांसाठी मोहीम
गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही कारणांनी गोवर आणि रूबेला यांचे डोस चुकलेल्या बालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान केवळ गावातीलच डोस चुकलेल्या बालकांना नाही तर रस्त्यावर काम करणाऱ्या मजूर, नव्याने झोपड्या उभारून राहणारी कुटुंब यांच्याशीही संपर्क करून त्यांच्या बालकांनाही डोस मिळाला आहे की नाही, याची खातरजमा करून त्यांनाही डोस दिला जाणार आहे.