रत्नागिरी-जिल्ह्यामधील 24 आरोग्य संस्थांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यामधील 24 आरोग्य संस्थांना पुरस्कार
रत्नागिरी-जिल्ह्यामधील 24 आरोग्य संस्थांना पुरस्कार

रत्नागिरी-जिल्ह्यामधील 24 आरोग्य संस्थांना पुरस्कार

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२४p३९.jpg-L७०७५९ रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र
--------
जिल्ह्यामधील २४ आरोग्य संस्थांना पुरस्कार

कायाकल्प योजना; रामपूर केंद्राला २ लाखाचे प्रथम पारितोषिक
रत्नागिरी, ता. २४ ः सरकारी आरोग्य संस्थांमधून देणाऱ्या वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कायाकल्प पुरस्कार योजना हाती घेतली आहे. या योजनेत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४ आरोग्य संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये १३ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ११ आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा समावेश आहे. सर्व आरोग्य संस्थांनी मिळून पटकावलेली पुरस्कारांची रक्कम ११ लाख ८५ हजार रुपये एवढी आहे.
कायाकल्प पुरस्कारअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रामपूर (चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक मिळाले असून, शिरगांव (चिपळूण), कापरे (चिपळूण), कोळवली (गुहागर), कोरेगांव (खेड), दादर (चिपळूण), धारतळे (राजापूर), कुंबळे (मंडणगड), जैतापूर (राजापूर), फुरूस (चिपळूण), ओणी (राजापूर), अडरे (चिपळूण), साटवली (लांजा) या प्राथमिक आरोग्यकेंद्रांना प्रत्येकी ५० हजाराचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रामधून आंबडवे (मंडणगड) केंद्राला प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळाले असून, भिले (चिपळूण) केंद्राला द्वितीय क्रमांकाचे ५० हजाराचे पारितोषिक, निर्ह्वाळ (चिपळूण) केंद्राला तृतीय क्रमांकाचे ३५ हजाराचे पारितोषिक मिळाले असून, पेढांबे (चिपळूण), टेरव (चिपळूण), कोळकेवाडी (चिपळूण), वेळणेश्वर (गुहागर), मांडकी (चिपळूण), काटवली (संगमेश्वर), मांडवे (खेड) या आरोग्यवर्धिनी केंद्रांना प्रत्येकी २५ हजाराचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. या रकमेचा उपयोग आरोग्यसंस्थांच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी सर्वसामान्यांना उत्कृष्ट सेवा सुविधा देण्यासाठी केला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून कौतुक
पुरस्कारासाठी रुग्णालयाची आतील व परिसर स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडिकलसह घन व द्रवरूप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण आहेत. सर्व पुरस्कारप्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी अभिनंदन केले आहे.