निश्‍चयापुढे अवघड वाटेनेही टेकले हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निश्‍चयापुढे अवघड वाटेनेही टेकले हात
निश्‍चयापुढे अवघड वाटेनेही टेकले हात

निश्‍चयापुढे अवघड वाटेनेही टेकले हात

sakal_logo
By

पाऊलखुणा ः भाग - १०१

70799
एका कौटुंबिक क्षणी डाव्या बाजूने मृगेंद्रसिंह कागल ज्यु., कल्पना राजे कागल ज्यु., राजमाता पार्वतीदेवी, युवराज खेमसावंत, राजकुमारी शिवप्रियादेवी भोसले, राजकुमार रणवीरसिंह जिंद.


निश्‍चयापुढे अवघड वाटेनेही टेकले हात

लीड
सावंतवाडी संस्थानात मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी राजमाता पार्वतीदेवी स्वतः साथग्रस्त भागात दौरा करायच्या. प्रसंगी आपले आरोग्य पणाला लावून हा दौरा असायचा. प्रजेचे प्रश्‍न समजून घेण्याबरोबरच शक्य तितकी सेवा आपल्या हातून घडावी, यासाठी त्यांची धडपड होती. त्यांचा शिवापूर येथे झालेला असाच एक दौरा त्यांचे प्रजेसाठी प्रामाणिक प्रयत्न, धाडस आणि बरेच काही सांगणारा आहे.
-----------------
राजमाता पार्वतीदेवी थेट प्रजेशी संपर्कावर भर द्यायच्या. यामुळे नेमके प्रश्‍न समजून त्यातून मार्ग काढणे सोपे व्हायचे. यासाठी गावोगाव कॅम्प व्हायचे. याच्या जोडीला आरोग्याच्या प्रश्‍नांबाबत मार्ग काढण्यासाठी त्या थेट साथग्रस्त भागातही पोहोचायच्या. लोकांशी संवाद साधायच्या. त्या १९३५ च्या दरम्यान स्वतः आरोग्याविषयी अनेक किचकट प्रसंगातून गेल्या होत्या. त्यामुळे प्रजेच्या विशेषतः महिलांच्या आरोग्याविषयी त्या अधिक संवेदनशील होत्या. प्रजेच्या आरोग्यप्रश्‍नांच्यावेळी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.
आरोग्य जागृतीसाठी सुरू केलेले सप्ताह हे याच भावनेतून होते. गावोगाव अशा सप्ताहाने जागृती उपक्रम घेतले जायचे. त्याच्या यशासाठी त्या स्वतः काटेकोर प्रयत्न करत असत. प्रसंगी नर्सिंगची कामे स्वतः करण्यातही त्या मागेपुढे पाहत नसत. राजमाता उपस्थित असल्यामुळे सरकारी यंत्रणा, गावातील कार्यकर्ते आपोआप जबाबदारी पार पाडण्यासाठी खबरदारी घेत असत. यामुळे आरोग्य सप्ताहाच्या यशाची टक्केवारी वाढत असे. आरोग्य सप्ताहाच्या समारोपावेळी चहापार्टी होत असे. यावेळी गावोगावच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण असे. यात आरोग्य, ग्रामविकास यांच्या चर्चेला प्रभावी व्यासपीठ मिळत असे.
आरोग्याच्या समस्या, साथरोग निर्माण झाल्यास त्या भागात स्वतः राजमाता जात असत. त्या काळात बहुसंख्य साथरोग पसरलेल्या भागामध्ये भीतीचे वातावरण असायचे. असे असूनही स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता त्या दौरा करायच्या, लोकात मिसळायच्या. अशाच एका दौऱ्याबाबतचे संदर्भ प्रा. जी. एम. शिरोडकर यांनी राजमातांच्या ‘स्मृतिदर्शन’ पुस्तकात दिले आहेत. यानुसार त्या काळात माणगाव खोऱ्यामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव दीर्घकाळ होता. या खोऱ्यातील काही भागांमध्ये मलेरियामुळे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात घटली होती. संस्थानतर्फे येथे मलेरिया उच्चाटनासाठी विशेष लक्ष दिले जात होते. माणगाव खोऱ्यात या सगळ्याच्या पाहणीसाठी राजमातांनी दौरा आखला. त्यांचा मुक्काम दुकानवाडला होता. या खोऱ्यातील शेवटचे टोक असलेल्या शिवापूरमध्ये जाण्याचे नियोजन होते. शक्य आहे तिथपर्यंत मोटारीने व पुढे घोड्यावरून असा राजमातांचा प्रवास असायचा. शिवापूरमध्ये त्या काळात रस्ता पोहोचला नव्हता. कर्ली नदी या गावाच्या वाटेवर अनेकदा आडवी येत असल्याने आणि सह्याद्रीचा घनदाट भाग यामुळे शिवापूर तसे अतिदुर्गम ठिकाण असल्याचे मानले जायचे.
राजमातांनी शिवापूरला जाण्यासाठी वसोलीपर्यंतचा प्रवास मोटारीतून केला. पुढे चार ते पाच मैलांची पायवाट दुर्गम, दाट जंगलातून जाणारी होती. त्यावर घोड्यावरून जाण्याचे नियोजन होते. मोटारीतून उतरून त्या घोड्यावर बसण्यासाठी गेल्या. त्यांनी एक पाय रिकीबीत टाकला आणि दुसरा उचलणार इतक्यात घोडा पुढच्या दोन पायांवर उभा राहिला. घोड्याचा लगामही तुटला. राजमाता खाली पडण्याची भीती होती; पण त्यांनी स्वतःला सावरले. सोबत असलेल्यांना ‘आपल्याला काही विशेष झाले नाही’, असे सांगून त्या पुन्हा प्रवासासाठी सज्ज झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘जरा पडलं म्हणून काय झालं? त्याला काय भ्यायचे. तिकडे लोक माझी वाट पाहत असतील. आण रे घोडी’’, असे म्हणून त्या पुन्हा स्वार होण्यासाठी सज्ज झाल्या. घोडा काही अंतरावर गेला असेल नसेल, तोच पुन्हा उधळला. राजमाता खाली पडल्या. मागून मंडळी येण्याआधीच त्या सावरून उठून उभ्या राहिल्या. हाताला खरचटल्याचे दिसत होते; मात्र त्यांचा निश्‍चय ढळला नाही. ‘विशेष काही नाही, आण रे ती घोडी’, असे त्या पुन्हा उद्गारल्या. ‘‘लोकांनी इतकी मेहनत घेऊन तयारी केली असणार, त्यांची निराशा करायची नाही. मला गेलेच पाहिजे’’, हे त्यांचे शब्द कायम होते. तेथे उपस्थित एक शेतकरी राजमातांना म्हणाला की, ‘‘आमी तुमका जावूक देवचव नाय.’’ तेथे उपस्थित शिवापूरमधील काही प्रतिष्ठितांनी डोळ्यात अश्रू आणून ‘‘महाराज, आम्हाला येथेच आपले शिवापूर येणे पावले. आता आपण दुकानवाडला जाऊन भोजन करून विश्रांती घ्या,’’ असे सांगितले. यावर राजमाता म्हणाल्या, ‘‘शिवापूरला जाण्याचा बेत रद्द करता येणार नाही. फार तर दुपारी किंवा उद्या सकाळी जाऊ.’’ तेथून दुकानवाडला परतल्यावर राजमातांना झालेली दुखापत किरकोळ नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. तरीही त्या शिवापूरला जाण्याच्या म्हणण्यावर ठाम होत्या. अंग बरेच ठेचाळले होते. घोड्यावरून त्या शिवापूरला जाऊ शकतील अशी स्थिती नव्हती; मात्र प्रजेबाबतचे प्रेम, जबाबदारी आणि धैर्य याच्यासमोर परिस्थितीनेही हात टेकले. दुसऱ्या दिवशी ती अवघड वाट पार करत राजमाता घोड्यावरून शिवापूरला पोहोचल्याच. त्यांना पाहून शिवापूरमधील रहिवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. तरीही लोकांनी ‘त्यांचे प्राण लाख मोलाचे असून ते असे धोक्यात घालू नयेत’, असा प्रेमाचा सल्ला दिला.
................
चौकट
आरोग्यसेवेचा सुवर्णकाळ
राजमातांनी आपल्या कार्यकाळात आरोग्यसुविधा प्रभावी करण्यावर भर दिला. यासाठी डॉ. मेहता, डॉ. सुवर्ण यांच्यासारखे प्रसिद्ध चीफ मेडिकल ऑफिसर नेमून सावंतवाडीच्या रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी केली. १९४० ते ४३ या कार्यकाळात या रुग्णालयाचे सुवर्णयुग होते. त्या काळात रत्नागिरी, गोवा येथूनही रुग्ण उपचारासाठी सावंतवाडीत येत असत. कसाल, भेडशी, नेरूर अशा भागांत शिशू मेळावे, आरोग्य सप्ताह घेतले जायचे. त्याला स्वतः राजमाता उपस्थित राहायच्या. सावंतवाडीतील राणी जानकीबाई सुतिकागृहाच्या विस्तारासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. या संस्थेच्या स्थैर्यासाठी देणग्यांच्या माध्यमातून निधी संकलनास चालना दिली. १९४३ च्या कालखंडात या सुतिकागृहात जवळजवळ ५०० जणींची प्रसुती होत असे. यावरून राजमातांच्या आरोग्यविषयी कामाचा प्रभाव लक्षात येतो.