मोती तलाव कामास अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती तलाव कामास अखेर मुहूर्त
मोती तलाव कामास अखेर मुहूर्त

मोती तलाव कामास अखेर मुहूर्त

sakal_logo
By

70849
सावंतवाडी : मोती तलाव कठड्याच्या कामाचे भूमिपूजन करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. सोबत पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

मोती तलाव कामास अखेर मुहूर्त

कठड्याची दुरुस्ती सुरू; शालेय शिक्षणमंत्री केसरकरांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः चुकीच्या पध्दतीने गाळ काढल्याने कोसळलेल्या येथील मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. गेली कित्येक महिने भग्नावस्थेत असलेल्या कठड्याचे काम होण्यासाठी अनेकांनी आवाज उठविला होता.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मोती तलावात असलेला गाळ काढण्यासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न केला. यासाठी येथे पालिकेमध्ये शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत बैठकीही पार पडली होती. या बैठकीला राजघराण्याचे युवराज लखमराजे सुध्दा उपस्थित होते. गाळ काढताना चुकीच्या पद्धतीने काढल्याने मोती तलावाचा कठडा कोसळला होता. एकूणच यामुळे नजीकच्या मुंबई-गोवा महामार्गाला धोका निर्माण झाला होता. कठडा कोसळल्यानंतर अनेक नागरिकांनी पालिका प्रशासन व बांधकाम विभागाला दोषी धरून याबाबत आवाज उठविला होता. कठड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणीही लावून धरली होती; मात्र गेले पाच-सहा महिने या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने मोती तलावाचे सौंदर्य बाधित झाले होते. अखेर आज शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते कठड्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी ५०-५० लाखाच्या दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका भारती मोरे, माजी नगरसेविका दीपाली सावंत, माजी नगरसेविका माधुरी वाडकर, तानाजी वाडकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
--
साळगावकरांच्या मागणीची दखल
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अलीकडेच कठड्याचे काम हाती घेण्यात यावे, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेतली होती. यावेळी चव्हाण यांनी हे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर साळगावकर यांनी आपली भूमिका मागे घेतली होती.