
बॅ. नाथ पैंचे शालेय सोबती परमानंद परब यांचे निधन
70921
परमानंद परब
बॅ. नाथ पैंचे शालेय सोबती
परमानंद परब यांचे निधन
कुडाळ, ता. २५ ः संसदपटू बॅ. नाथ पै यांचे शालेय जीवनातील सोबती मूळ वेंगुर्ले शहरातील आणि सध्या पिंगुळी-काळेपाणी येथील रहिवासी परमानंद अर्जुन परब (वय १०१) यांचे गुरुवारी (ता. २२) दुपारी पिंगुळी येथे निधन झाले. ते वेंगुर्ले येथे ‘बाबी चोपदार’, तर पिंगुळी परिसरात ‘मामा परब’ नावाने प्रसिद्ध होते. परब हे पूर्वी मुंबई येथे रेल्वेत नोकरीला होते. ते मूळ वेंगुर्ले शहरातील रामघाट रोड येथील रहिवासी होत. पन्नास वर्षांपूर्वी पिंगुळी-काळेपाणी येथे जागा घेऊन ते कुटुंबासह स्थायिक झाले. ते शांत स्वभावाचे व समाजवादी विचारसरणीचे होते. शंभरीत पदार्पण केल्यानंतर पिंगुळी ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या सत्कार केला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले येथे झाले. नाथ पै शिक्षण घेत असलेल्या शाळा क्र. १ तालुका स्कूलमध्ये नाथ पै यांचे शालेय सोबती म्हणून पहिली ते तिसरीपर्यंत होते. नाथ पै यांच्या शालेय जीवनातील मित्र अशीही त्यांची ओळख होती. बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नाथ पै यांची नात अदिती पै यांच्या हस्ते परब यांचा निवासस्थानी जाऊन वयाच्या ९९ वर्षी सत्कार केला होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. पिंगुळी येथील वायमन गॉर्डनचे कर्मचारी मुरलीधर परब, परब सायकल स्टोअर्सचे मालक श्रीधर परब व पाट हायस्कूलचे निवृत्त शिक्षक कमलाकर परब यांचे ते वडील होत.