हनुमंतगड पर्यटकांसाठी पर्वणीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमंतगड पर्यटकांसाठी पर्वणीच
हनुमंतगड पर्यटकांसाठी पर्वणीच

हनुमंतगड पर्यटकांसाठी पर्वणीच

sakal_logo
By

70930
फुकेरी हनुमंत गडावर विधिवत पूजन करून स्मारकाचे लोकार्पण करताना परशुराम गंगावणे, नीलेश राणे व इतर.
70931
शिवभक्तांनी भंडारा उधळून जल्लोष साजरा केला.
70932
हनुमंत गडावर उपस्थित शिवभक्त. (सर्व छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)

हनुमंतगड पर्यटकांसाठी पर्वणीच

माजी खासदार नीलेश राणे ः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तोफगाड्याचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः गेली ३ वर्षे अहोरात्र मेहनत घेऊन सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी फुकेरी हनुमंतगडाचे संवर्धन करून त्याचे मूळ स्वरूप लोकांसमोर आणले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील हा शिवकालीन गड असल्याने भविष्यात इतिहास संशोधक व पर्यटकंसाठी पर्वणी ठरणार आहे. प्रतिष्ठानच्या या कार्याला तोड नसून माझ्यासह प्रत्येक नागरिकांचा सलाम आहे. हे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निःस्वार्थीपने काम करणारे मावळे आहेत. शासनाच्या मदतीची वाट न पाहता राणे कुटुंबीय गडाच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी फुकेरी हनुमंतगड येथे दिला.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. पद्मश्री परशुराम गंगावणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्मारकाचा जीर्णोद्धार तसेच तोफगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भंडारा उधळून तसेच पुष्पवृष्टी करत हजारो शिवभक्तांनी पारंपरिक ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजमंगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गड संवर्धन मोहिमेत सहकार्य करणारे फुकेरी ग्रामस्थ, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या महिला तसेच स्मारकासाठी शिवरायांची दीड टन वजनाची भव्य मूर्ती देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शिवभक्तांचा शाल, श्रीफळ, गुलाब व शिवरायांची भव्य प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
राजन तेली म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याला गड किल्ल्यांचा इतिहास आहे. राज्यातील गड, किल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन व जतन व्हावे, यासाठी राज्याने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नियोजन मंडळाकडे निधी असून या किल्ल्याच्या पर्यटन व भौतिक विकासासाठी ''क'' वर्ग पर्यटनातून निधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. परशुराम गंगावणे म्हणाले की, गड किल्ले हे आपले वैभव आहे. या गडांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा. हनुमंतगडाचा इतिहास व महती सर्वदूर पोचविण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी गडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती. यामध्ये महिलांसह आबालवृद्धांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी केले.
--
शिवरायांचे स्मारक उभारण्याचा संकल्प
सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गोजमंगुडे म्हणाले की, हनुमंत गडाचे संवर्धन करण्याचे कठीण काम तीन वर्षांपूर्वी हाती घेतले. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दुर्ग सेवक सहभागी झाले. तळमळीने काम करण्याच्या भूमिकेला स्थानिकांनी भक्कम साथ दिली. डोंगरात व दरीत मातीत लुप्त झालेल्या दोन तोफा शोधून त्यांचे संवर्धन केले. राज्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणारे १८ हजार दुर्ग सेवक आहेत. आतापर्यंत समुद्रातून १४ तोफा शोधून बाहेर काढल्या आहेत. या सर्व तोफा साफसफाई करून विविध गडावर पुनर्स्थापित केल्या आहेत. जंजिरा किल्ल्यावर २४ तास ध्वज फडकवत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. भविष्यात राज्यातील प्रत्येक गड, किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आहे.