‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ एक संग्राह्य पुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ 
एक संग्राह्य पुस्तक
‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ एक संग्राह्य पुस्तक

‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ एक संग्राह्य पुस्तक

sakal_logo
By

71085
वृंदा कांबळी

‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’
एक संग्राह्य पुस्तक

लीड
गोव्यातील पौर्णिमा केरकर या लेखिकेचे ‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ हे पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक प्रत्येक वाचकाने संग्रही ठेवायला हवे, असे मौल्यवान आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना तर ते संदर्भासाठी वापरता येईल. पुस्तक हातात घेताच जाणवते ती लेखिकेने यासाठी घेतलेली मेहनत. पाने पलटू लागताच लक्ष वेधून घेतात ते आतील स्पष्ट, ठळक व उत्तम छायाचित्रे. नकळतच आपण आतील मजकूर वाचू लागतो आणि वाचता वाचता आपल्या बालपणात कधी पोहोचतो समजतही नाही. आपण ग्रामीण भागात बालपणी पाहिलेली, जगलेली सगळी लोकसंस्कृती समोर उभी ठाकते. उत्सुकतेने आपण पुढे पुढे वाचत जातो.
- सौ. वृंदा कांबळी
.............
लेखिकेचे बालपण खेड्यातील मुक्त वातावरणात गेले. मुसळ, वायन, जाते, पाटा-वरवंटा, रगडा, मांड-दवली, पाण्याची लाट आदी सगळे लेखिकेने अनुभवले आहे. गावठी नळ्यांची कौले, घर शाकारणी वगैरे ग्रामीण भागातील लोकांचे अशा प्रसंगी मिळणारे सहकार्य पाहिले आहे. शेतीची अवजारे, शेतीची पद्धत, उकडे तांदूळ करणे, भात कांडणे, पोहे कांडणे सर्व जवळून पाहिले आहे. शेतीची विविध अवजारे व त्यांचे उपयोग हे सर्व सांगत असताना नुसतेच रुक्ष वर्णन नाही, तर लेखिकेची भाषाही लालित्यपूर्ण आहे. प्रत्ययकारक अशी चित्रे आहेत. आकर्षक फोटो आहेत. अशा विविध अंगांनी हे पुस्तक खूप उंचीवर पोहोचले आहे. आज मानवी जीवन फार झपाट्याने बदलते आहे. या परिवर्तनाच्या गतीत हे पूर्वीचे जीवन व त्या जीवनातील ही सर्व साधने अडगळीत टाकली गेलीत. हळूहळू ती विस्मृतीत जातील. तर हा समृद्ध वारसा जतन केला पाहिजे व तो पुढील पिढीला दिला पाहिजे. यासाठी या पुस्तकाचा चांगला उपयोग होऊ शकतो. पुढील पिढीतील मुलांना विहीर म्हणजे काय, जोत म्हणजे काय, हे सांगावे लागेल. त्यावेळी या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होईल. केवळ शेतीची अवजारे व इतर साधने एवढेच न सांगता जुन्या काळातील विविध सणवार साजरे करण्याच्या पद्धती, लग्नातील हळद लावणे, केळवण करणे, घाणे भरणे अशा अनेक प्रसंगांचे फोटो, त्यातील विविध साधने, त्यातील पद्धती, समजुती व अशा प्रसंगी स्त्रिंयानी म्हणावयाची लोकगीते आदी सर्व अंगांनी लोकजीवनाचे चित्र उमटवले आहे. वर्णने माहितीपर असूनही लेखिकेचे भाषेवर प्रभुत्व असल्याने वर्णनात लालित्य आले आहे. पुढे पुढे वाचनाची उत्सुकता वाढत राहते. भारतीय जीवनपद्धतीत पायाभूय बैठक असलेल्या सौंदर्यपूर्ण गोष्टी गतिमान जीवनप्रवाहात नष्ट होत चालल्या आहेत. याविषयीचे दुःख लेखिकेच्या मनात आहे, ते लेख वाचताना जाणवते. आपणही तसेच व्यथित होतो. अर्थात येणारे बदल स्वीकारायलाच हवेत, हेही लेखिका मान्य करते. भूतकाळाविषयीचे अकारण हळवेपण नाही. वर्तमानालाही लेखिका आनंदाने सामोरी जाते. तुळस, सूप, अशा वस्तूंविषयी सांगत असताना त्यांची उपयुक्तता तसेच त्याविषयीच्या म्हणी व वाक्प्रचार हेही सांगितले आहेत. केरसुणी, चूल, तवा, जाते, वायन, मुसळ, कुंडला, पाटा-वरवंटा, कोयतो, पाट, पोळपाट, पितळी, कायल, कोफरो, गोवऱ्या, अडकित्ता, चंची, न्हाणी, चुडा, पाळणा, माटोव, झोपाळा, पेटारा, निसण, आरामखुर्ची, दुडगा, दांडी, कुऱ्हाड, रहाट, इरले, नांगर, गोठा, बैलघाणा, मळणी, गोफण, हातमाग, चणाभट्टी, गुऱ्हाळ इत्यादी अनेक बाबींचे लेखिकेने केलेले फोटोसहित सविस्तर वर्णन व उपयुक्तता खरोखर वाचनीय आहे. ही सगळी वर्णने म्हणजे शतकानुशतके चालत आलेल्या गावरहाटीचे वर्णन आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या गरजांशी निगडीत अशाच या वस्तू आहेत. आताचे तंत्रज्ञान जन्माला येण्यापूर्वीचे तंत्र कौशल्य, त्यावेळच्या माणसांची बुद्धीची चमक, कल्पकता, सौंदर्यदृष्टी आदी अनेक गोष्टी त्यातून लक्षात येतात.
आपल्या लोकजीवनातून विस्मृतीच्या उंबरठ्यावर असलेल्या या वस्तू म्हणजे लोप पावत चाललेली एक ग्रामीण संस्कृतीच होय. लोकजीवनाचे निदर्शक असलेल्या या वस्तूंचे जतन व संवर्धन गतिमान जीवनप्रवाहात होणे अवघड आहे; पण ज्या वस्तूंमुळे, साधनांमुळे आजपर्यंतचे आपले जीवन समृद्ध झाले होते, ज्यामुळे आपली सांस्कृतिक मूल्ये टिकून राहिली होती, त्या जुन्या वस्तूंची ओळख पुढील पिढीला करून देणे आवश्यक आहे. लेखिकेने बुद्धी, प्रतिभा आणि अथक मेहनतीच्या सहाय्याने केलेला हा पुस्तकप्रपंच खरोखरच कौतुकास्पद आहे. पुस्तक वाचताना एक संपन्न असे गावरहाटीचे चित्र समोर उभे ठाकते. या पुस्तकाविषयी खूप काही लिहिता येईल. प्रत्येकाने हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा व ते संग्रही ठेवावे. प्रत्येक घराघरातून हे पुस्तक असायला हवे. लेखिकेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.