
रत्नागिरीची ऋतुजा जाधव प्रथम
71114
कुडाळ ः सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धेत रत्नागिरीची ऋतुजा जाधव मानकरी ठरली. बाजूला अन्य विजेत्या. (छायाचित्र ः अजय सावंत)
रत्नागिरीची ऋतुजा जाधव प्रथम
सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा; गवळदेव मित्रमंडळातर्फे कुडाळमध्ये आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः येथील श्री गवळदेव मित्रमंडळ आणि उत्सव मंडळ आयोजित सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धेचा गवळदेव महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून आलेल्या १५ स्पर्धकांनी विविध स्पर्धा फेऱ्यांना आणि प्रश्नोत्तरांना सामोरे जात स्पर्धेत रंगत आणली. रॅम्पवॉक, टॅलेंट राउंड याबरोबरच आजचे सामाजिक प्रश्न, तरुण पिढी समोरची आव्हाने, सोशल मीडियाचा अतिरेक, तरुणांमधील वाढत्या आत्महत्या अशा समस्यांवर भाष्य करत आणि आपली मते मांडत स्पर्धकांनी केलेल्या जोरदार परफॉर्मन्समुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. यात रत्नागिरीच्या ऋतुजा जाधव हिने विजेतपद पटकावले. रेडीची पूजा राणे द्वितीय, सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर तृतीय ठरली. कणकवलीच्या श्वेता मिशाळ, कुडाळच्या शर्वरी नंबर यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.
श्री गवळदेव मंदिर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मित्रमंडळ आणि उत्सव मंडळाच्या वतीने तीन दिवसांचा गवळदेव खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव सध्या गवळदेव मंदिर नजीक सुरू आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काल (ता. २५) ''सुंदर व्यक्तिमत्व'' स्पर्धा झाली. स्पर्धेत श्वेता मिशाळ (कणकवली), मोहिनी मानकर (रत्नागिरी), योगिता राणे (मालवण), जान्हवी म्हापसेकर (देवगड), शीतल टिक्कस (कुडाळ), भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), पूजा राणे (रेडी), पूनम परब (तुळस-वेंगुर्ले), बेला सामंत (कुडाळ), मिनू देऊलकर (मालवण), शर्वरी नाबर (कुडाळ), पूजा म्हाडदळकर (कुडाळ), ऋतुजा जाधव (रत्नागिरी), पंकजा जाधव (रत्नागिरी), डॉ. निशा धुरी (देवगड) अशा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये रंगतदार झाली. पहिली फेरी पारंपरिक वेशभूषा आणि ओळख अशी होती. त्यात स्पर्धकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅम्पवॉक केला आणि आपली ओळख करून दिली. त्यांनतर दुसऱ्या आवडता पोशाख आणि टॅलेंट या फेरीत आकर्षक पोशाख करून स्पर्धकांनी नृत्य, अभिनय, भाषण यातून कलागुणांचे सादरीकरण केले. दगम्यान, सर्व फेऱ्या संपल्यानंतर निवेदक नीलेश गुरव यांनी निकाल जाहीर केला. पूजा राणे हिला बेस्ट रॅम्पवॉक, भक्ती जामसंडेकर हिला बेस्ट कॉस्चुम, कणकवलीच्या श्वेता मिशाळ हिला बेस्ट स्माईलचे बक्षीस मिळाले. परीक्षण गजानन कांदळगावकर, केदार देसाई, डॉ. सोनल लेले आणि आशा दळवी यांनी केले. तर सूत्रसंचालन नीलेश गुरव आणि प्रणाली मयेकर यांनी केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष दादा पडते, उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत राणे, महिला मंडळ अध्यक्ष कल्पना पडते, महेश कुंभार, सचिन सावंत, राजेश पडते, मनोज सावंत, नीलेश परब, सचिन कुंभार, विरेश तिरोडकर, विजय कुंभार, सचिन कुंभार, भूषण तेजम, नेहा पडते, रुपाली शिरसाट, प्रज्ञा राणे, नीता राणे, प्रीती तायशेटे, रिना पडते, संजू पडते परिवार तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन महोत्सवाचे आणि स्पर्धेचे कौतुक केले.
--
चौकट
जनरल नॉलेजवर आधारीत प्रश्न
यावेळी जनरल नॉलेजवर आधारीत प्रश्न स्पर्धकांना विचारण्यात आले. उत्तर येत नसल्यास प्रश्नाचे उत्तर गुगलवर शोधण्याचा पर्याय दिला होता. बंड्या जोशी यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांमुळे ही फेरी उत्तरोत्तर रंगत गेली. प्रेक्षकांनी देखील या फेरीचा आनंद घेतला. पाश्चात्य पोशाख आणि परीक्षक प्रश्न ही तिसरी फेरी होती. त्यावर परीक्षकांनी विविध प्रश्न विचारून स्पर्धकांची चांगलीच परीक्षा घेतली. सर्व स्पर्धकही चांगल्याप्रकारे सामोरे गेले.