चिपळूण - नागावे येथे नवीन पुल उभारणीचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - नागावे येथे नवीन पुल उभारणीचे काम सुरू
चिपळूण - नागावे येथे नवीन पुल उभारणीचे काम सुरू

चिपळूण - नागावे येथे नवीन पुल उभारणीचे काम सुरू

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२६p१३.jpg-KOP२२L७११०८ नागावे ः जुना पूल तोडून नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे.
-------------

नागावेत नवीन पूल उभारणीचे काम सुरू
चिपळूण-पोफळी मार्ग ; नदीत भराव टाकून तात्पुरता रस्ता
चिपळूण, ता. २६ : चिपळूण-पोफळी मार्गावर नागावे येथे अरुंद पूल तोडून नवीन पूल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी, यासाठी नदीत मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीचा विचार करता दुपदरी पूल तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
अलोरे येथे कोयना प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा प्रकल्पाची यंत्रणा आणण्यासाठी पोफळी, शिरगाव, नागावे, पेढांबे आदी ठिकाणी जलसंपदा विभागाकडून रस्ता आणि पूल बांधण्यात आले होते. त्याकाळी या भागात वाहनांची वर्दळ फारच कमी होती. त्यामुळे साडेतीन मीटर रुंदीचे रस्ते आणि पूल बांधण्यात आले होते. नंतरच्या काळात हळूहळू या मार्गावरील वाहतूक वाढत गेली तशी या मार्गावर वाहनांची वर्दळही वाढली. अलोरे परिसरात कोयना प्रकल्पाचे काम सुरू असेपर्यंत येथील रस्ते आणि पुलांची देखभाल दुरुस्ती जलसंपदा विभागाकडून केली जात होती. प्रकल्पाचे काम संपल्यानंतर मागील १५ वर्ष रस्ते दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता.
चिपळूणहून पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्रहून चिपळूणकडे धावणाऱ्या एसटीच्या सर्व गाड्या याच मार्गावरून धावतात. त्याशिवाय लोकल आणि लांबपल्ल्याची खासगी वाहतूक या मार्गावरून होते. नागावे येथील पूल फारच अरुंद असल्यामुळे या पुलावरून एकच गाडी मार्गस्थ होते. त्यामुळे एकाच वेळी पुलावर दोन वाहने आली तर वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रश्न येथे नेहमीच निर्माण होतो. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना फार मोठी कसरत करावी लागते. नागावे येथील या अरुंद पुलांचे संरक्षण कठडे जीर्ण झाले होते. दरम्यान पेढांबेपासून अलोरे पोफळीपर्यंतचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्ती सुरू झाली. तत्कालीन आमदार सदानंद चव्हाण यांनी नागावे, पेढांबे येथील जुने अरुंद पूल तोडून नवीन पूल बांधण्याची मागणी शासनाकडे केली होती. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याबाबतचा अंदाजपत्रक ही तयार करण्यात आले होते. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पुलाच्या उभारणीसाठी दोन कोटी चाळीस लाखांची तरतूद केली. त्यामुळे सदरचे काम सुरू झाले आहे.
पूल उभारणीचे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा नको म्हणून नदीत मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. कोळकेवाडीतून येणाऱ्या बोलदवाडी नाल्याचे पाणी या नदीला बारमाही असते. त्यामुळे सिमेंटचे पाईपही टाकण्यात आले आहेत.

कोट
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागावे येथे पूल उभारणीचे काम हाती घेतल्यामुळे वाहन चालकांची फार मोठी गैरसोय दूर होणार आहे. पुलाच्या परिसरातच जलसंपदाचे यांत्रिकी विभागाचे कार्यालय आणि गॅरेज आहे. यांत्रिकी विभागातील येथील यंत्रणा नेहमीच वेगवेगळ्या पाठवली जाते. त्यामुळे यांत्रिकी विभागाची ही गैरसोय दूर होणार आहे.
---सुरेश कदम, पेढांबे