कुंब्रलमधील एका निकालास आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंब्रलमधील एका निकालास आक्षेप
कुंब्रलमधील एका निकालास आक्षेप

कुंब्रलमधील एका निकालास आक्षेप

sakal_logo
By

कुंब्रलमधील एका निकालास आक्षेप

दिनेश धुरींचा आरोप; ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २६ ः ग्रामपंचायत निवडणूक निकालावेळी घोळ झाल्याचा आरोप कुंब्रल प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार दिनेश धुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. आपल्याला आधी विजयी घोषित करण्यात आले; मात्र नंतर दुपारी कागदोपत्री निकाल वेगळाच जाहीर झाला, असा आरोप त्यांनी केला.
त्या प्रभागातील मतमोजणी वेळी आपल्याला मिळालेली मत संख्या व मतमोजणी निकाली अर्जावर दशविलेली मतसंख्या यात तफावत दिसून येत आहे. मतमोजणी वेळी सकाळी अकराला मला विजयी घोषित केले. मात्र दुपारी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीचा कागदोपत्री निकाल वेगळाच घोषित केला. शिवाय या निकाल अर्जावर माझी सही न घेता वेगळीच सही करून निकाल जाहीर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी काल (ता. २५) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्राम पालव, हनुमंत गाड उपस्थित होते.
श्री. धुरी म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात कुंब्रल प्रभाग २ मध्ये मतमोजणीत घोळ झाला आहे. आपल्या अनुपस्थितीत निवडणूक निकाल आकड्यात तफावत केली आहे. मतमोजणीवेळी मतपेटी सिल असताना प्रभाग २ मधून निवडणूक लढविणाऱ्या चारही उमेदवारांची एकाच कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली व मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीवेळी मतपेटीतील आकडेवारीनुसार मला स्वतःला १२२ मते पडली व विरोधी उमेदवाराला १०६ मते पडली होती. विरोधी उमेदवाराला पोस्टल असे एक मत जादा मिळाल्याने त्याची मतसंख्या १०७ एवढी झाली. यावेळी दिलेल्या आकडेवारीनुसार मी विजयी ठरलो होतो.
---
अपिल करण्याचा सल्ला
निकालानंतर आम्ही ग्रामदेवतेला श्रीफळ ठेवून दर्शन घेतले. गावात मिरवणूकही काढली. त्यानंतर एक धक्कादायक बातमी आपल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आली. मतमोजणी निकाल अर्जावर मला झालेल्या मतदानाची संख्या विरोधी उमेदवाराच्या नावे टाकून दुपारनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या उमेदवाराला विजयी घोषित केले. यावेळी मतमोजणी निकाल अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यांनी समक्ष माझी स्वाक्षरी घेणे अनिवार्य होते; मात्र या अर्जावर मी स्वाक्षरी केली नसतानाही त्यावर दुसरीच स्वाक्षरी आहे. अशाप्रकारे निवडणूक अधिकाऱ्यांनी माझ्यावर मोठा अन्याय केला आहे. दाद मागण्यासाठी तहसीलदारांकडे गेलो असता त्यांनी सर्व ऐकून न घेता अपील करण्यास सांगितल्याचे धुरी म्हणाले.
---
तहसीलदारांशी संपर्क नाही
दरम्यान, याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या या प्रतिनिधीने दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.