
गुहागर-चिंद्रवळे सलपेवाडीने घेतला क्रांतिकारी निर्णय
चिंद्रवळे सलपेवाडीने घेतला क्रांतिकारी निर्णय
मुलीने आईला दिला अग्नी ; पंचक्रोशीतील पहिलीच घटना
गुहागर, ता. २६ ः पूर्वीपार परंपरेच्या नावाखाली ज्या परंपरा चालू होत्या. त्याला छेद देण्याचे पहिले पाऊल गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे सलपेवाडीतील महिलेने उचलले आहे. मुलीने मृत आईला अग्नी दिला आहे.
गुहागर चिंद्रवळे, सलपेवाडी येथील रुक्मिणी पांडुरंग डावल यांचे २४ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली आहेत. त्यामुळे अंत्यविधी कसे करावेत, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असणारे ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेचे माजी सरपंच बबनजी ठीक व वाडीतील सर्व वडीलधारी, जाणकार व महिला यांनी चर्चा करून त्यांच्या मुलीने म्हणजेच सौ. पार्वती अनंत देऊळे यांनी अंत्यविधीचे कार्य पार पाडावे, असे ठरविले. ग्रामस्थांनी तशी प्रत्यक्ष कृती सुद्धा केली. लोकनिंदेला न जुमानता गावातील ग्रामस्थांनी उचललेलं हे पाऊल क्रांतिकारी आहे.