शिक्षकावर खुणी हल्ला -कदमवाडीतील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकावर खुणी हल्ला -कदमवाडीतील घटना
शिक्षकावर खुणी हल्ला -कदमवाडीतील घटना

शिक्षकावर खुणी हल्ला -कदमवाडीतील घटना

sakal_logo
By

संजय सुतार - ७११५२, पंचनामा करताना ७१३५, दुचाकीवर वार -७११३४, गर्दी -७११३२
---------------------------------------------------------------------------

कोल्हापुरात शाळेजवळच
शिक्षकावर खुनी हल्ला

कदमवाडी-भोसलेवाडीतील माझी शाळेजवळ घटना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः नववीत शिकत असलेल्या भावाला शिक्षा केल्याच्या रागातून शिक्षकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. कदमवाडी-भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळाच्या माझी शाळेजवळ सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. संजय आनंदराव सुतार (वय ४८, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) असे गंभीर जखमी शिक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. मात्र, कोणालाही अटक झालेली नाही. श्री. सुतार यांच्या डोक्यावर, मानेवर हातावर असे पाच वार झाल्याचे रुग्णालयातून आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर कदमवाडीतील एका खासगी सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विद्यार्थ्याला शिक्षा केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे, तसेच संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
पोलिस आणि शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी छोटी सुट्टी संपल्यावर विद्यार्थी वर्गात पोहोचले. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या तयारीसाठीची बैठक सुरू असतानाच शाळेच्या मागील बाजूला उभी केलेली दुचाकी पडल्याचे श्री. सुतार यांना विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे ते बैठकीतून शाळेच्या मागील बाजूच्या दरवाजातून दुचाकी उभी करण्यासाठी गेले. तेथे थांबलेल्या दोघांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. काही वार दुचाकीच्या सीटवर बसले, तर काही वार श्री. सुतार यांच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर लागल्यामुळे ते रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ओरडा होताच तिघा हल्लेखोरांनी येणाऱ्या-जाणाऱ्या दोघा-तिघा दुचाकीधारकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही न थांबता पुढे गेले. यावेळी शाळेच्या चौकाजवळ असलेल्या गॅरेजसमोर जाऊन रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडल्याचे सांगून हल्लेखोर निघून गेले. यावेळी त्यांच्या हातात कोयत्यासारखी धारदार शस्त्रेही होती. ही माहिती मिळताच मेस्त्री भारत रानमाळे आणि रिक्षाचालक महेश हळदेकर घटनास्थळी पोहोचले. तेथे शिक्षक सुतार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतच रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. यानंतर ते पुन्हा घटनास्थळी आले.
दरम्यान, घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी-शिक्षक सैरभैर झाले. एकच गलका उडाला होता. शिक्षकांसह विद्यार्थ्यांना नेमके काय झाले हे कळत नव्हते. काहींनी शाळेचा मुख्य दरवाजा बंद केला. मात्र, विद्यार्थी भयभीत होऊ नयेत म्हणून तातडीने मुलांना सुटी देण्याचा निर्णय झाला. चौकात झालेली गर्दी. पोलिसांनी लावलेला बंदोबस्त. रस्त्यावर पडलेले रक्त. शेजारीच उभी असलेली दुचाकी, सुतार यांच्या पायातील एक चप्पल. अशा वातावरणात बघ्यांची गर्दी वाढत होती. घटनास्थळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनीही भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी गॅरेजमधील मेस्त्री आणि रिक्षाचा चालकही तेथे उपस्थित होते. त्यांनी आणि तेथे जमलेल्या पोलिसांनी माध्यमांसह इतरांना घडलेली घटना सांगितली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शाहूपुरी पोलिस ठाणे आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील तीन पथकांकडून संबंधित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. संबंधित कोल्हापूर शहर आणि परिसरातच असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांकडून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.


पूर्वनियोजित कट
घटनास्थळावरील स्थानिकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी लाथा मारून दुचाकी पाडली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांकडून शिक्षक सुतार यांना दुचाकी पडल्याचे सांगण्यास पाठविले. ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याचीही चर्चा घटनास्थळी होती. तसेच घटनास्थळावरून जाताना त्यांनी दगडानेही त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले.

कोट
काही दिवसांपूर्वी सातवीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला श्री. सुतार यांनी अंगठे धरून उभारण्याची शिक्षा दिली होती. त्याचा राग मनात धरून त्याच्या भावाकडून ही मारहाण झाल्याची फिर्याद श्री. सुतार यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.
- राजेश गवळी, पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे
-----------
पुढे सीसीटीव्ही, मागे हल्ला
माझी शाळेची इमारत मुख्य रस्त्याला लागून आहे. त्यामुळे त्यांच्या समोर सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, श्री. सुतार यांची दुचाकी शाळेच्या मागील बाजूच्या रस्त्यावर उभी केली होती. दुचाकी रस्त्यावर पडल्याचे कळताच श्री. सुतार मागील दरवाजातूनच दुचाकीजवळ पोहोचले. या भागात सीसीटीव्ही नाही. त्यामुळे पुढे सीसीटीव्ही आणि मागील बाजूस हल्ला झाला आहे. परिणामी, कदमवाडीकडून शाळेकडे येणाऱ्या रस्त्याकडील सीसीटीव्हीच आता पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

‘ब्रेक फेल’ झाला म्हणून...
सोमवार असल्यामुळे आज सर्व गॅरेज बंद असतात. मात्र, रिक्षाचालक महेश हळदेकर यांच्या रिक्षाचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्यांनी गॅरेजमधील मेस्त्री भारत रानमाळे यांना बोलावून गॅरेज उघडले होते. त्यामुळे ते घटनास्थळापासून जवळ होते. त्यांनीच वेळेत श्री. सुतार यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे वेळीच उपचार होऊ शकले.