देवगडात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
देवगडात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

देवगडात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

sakal_logo
By

65629

देवगडमध्ये सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

नगरपंचायत सभेत खडाजंगी; घनकचरा, सांडपाणी नियोजनासह पाणी योजनेवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा आणि नळपाणी पुरवठा योजनेवरून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नळपाणी योजनेच्या संदर्भातील कामाला कार्यारंभ आदेश देण्यामध्ये विलंब होत असल्याचा मुद्दा मांडण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाची काही छायाचित्रे सभागृहात दाखवून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. अखेर बराच काथ्याकूट झाल्यानंतर यापुढे येणारा विकास निधी पाण्यासाठी खर्च करण्याला प्राधान्य दर्शविण्यात आले.
येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, नितीन बांदेकर उपस्थित होते. नळपाणी योजनेच्या दुरुस्ती कामासंदर्भात निविदा निघूनही कामाला कार्यारंभ आदेश देण्यामध्ये विलंब होत असल्याचा मुद्दा भाजप नगरसेविका प्रणाली माने यांनी लावून धरला. या विषयावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. संबंधित ठेकेदाराचे मागील देयक देण्याचे बाकी असल्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधले. तसेच भाजपच्या कार्यकाळात निधी उपलब्ध असताना काही झाले नाही, असेही सत्ताधाऱ्यांनी सांगितले. तेव्हा आमचे सरकार नव्हते, असा मुद्दा विरोधकांनी मांडताच प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी देतात, त्याला सरकार कशाला हवे? असा प्रतिप्रश्‍न सत्ताधाऱ्यांनी केला. अखेर बराच काथ्याकूट झाल्यावर विकास निधी आल्यावर प्राधान्याने पाण्यासाठी खर्च करावा, असे ठरविण्यात आले. तसेच संबंधित ठेकेदाराचे मागील देयक देण्यावरही एकमत झाले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनावरून नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याबाबत घनकचऱ्याची काही छायाचित्रेही सभागृहात दाखवली. यावरूनही चर्चा रंगली. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरत किती जणांवर कारवाई केली? अशी विचारणा केली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या कार्यकाळात विकासकांबाबत तक्रारी असताना कोणती कारवाई केली होती? असा प्रतिप्रश्‍न केला. भाजपला जे जमले नाही, ते आम्ही आठ महिन्यात करून दाखवले, अशी टिप्पणी सत्ताधाऱ्यांनी केली. येथील आठवडी बाजार रस्त्याच्या एकाबाजूला बसवून बाजार विस्तारला जावा, असे ठरविण्यात आले.
..................
चौकट
भाजपचे सत्तेचे स्वप्न...
नगरपंचायत सभेला प्रभारी मुख्याधिकारी हजर नव्हते. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत सत्ताधार्‍यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सत्ताधारी कमी पडत असल्याचा विरोधकांनी सूर लावताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. भाजपला सत्ता मिळवण्याचे स्वप्न आहे; मात्र आपण येथून उठणार नाही, असे नगराध्यक्षांनी ठणकावले.
...................
चौकट
झिपलाईनमधून अवाजवी आकारणी
येथील समुद्रकिनारी असलेल्या झिपलाईनचा भाडे करार नूतनीकरण करण्याचा विषय येताच संबंधितांकडून पर्यटकांना अवाजवी रक्कम आकारली जात असल्याकडे भाजप नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी लक्ष वेधले. व्यवसाय करण्याला बंधन नाही; मात्र पर्यटकांकडून अवाजवी रक्कम घेतली जाऊ नये, असा मुद्दा त्यांनी मांडला. याचीच री ओढत सत्ताधारी नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी, पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. पर्यटकांचा विमा त्यांनी करायला हवा, असे सांगितले. सध्या महिन्याला चार हजार भाडे असल्याचे प्रशासनाने सांगताच भाडे वाढीबाबत पुढील सभेत निर्णय घ्यावा. तोपर्यंत महिनाभर तात्पुरती मुदतवाढ देण्याचे सूचविण्यात आले.