बांदा - संकेश्वर महामार्गाचे कोडे सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा - संकेश्वर महामार्गाचे कोडे सुटणार
बांदा - संकेश्वर महामार्गाचे कोडे सुटणार

बांदा - संकेश्वर महामार्गाचे कोडे सुटणार

sakal_logo
By

बांदा - संकेश्वर महामार्गाचे कोडे सुटणार

लवकरच सर्व्हे; तिसऱ्या टप्प्याच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मंजूरी

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः बांदा-संकेश्वर महामार्ग सावंतवाडी शहरातून की बाहेरुन? हे कोडे लवकरच सुटणार आहे. कारण तिसऱ्या टप्प्याच्या या कामाच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी शासनाने मंजूरी देऊन लवकर अहवाल देण्याची सुचना रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. त्यामुळेच लवकरच याबाबत टेंडर प्रक्रिया राबवून सर्व्हे करण्यात येणार आहे. रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी ही माहिती दिली.
बांदा-संकेश्वर महामार्गाचा तिसरा टप्पा म्हणजेच आजरा फाटा ते इन्सुली खामदेव नाका हा रस्ता आता कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाकडून रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला आहे. यापुढे या महामार्गासाठी आवश्यक सगळी प्रक्रिया रत्नागिरी कार्यालयातून करण्यात येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शासनाने हा निर्णय घेतला असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी आवश्यक परवानगी शासनाने दिली आहे. शिवाय लवकरात लवकर प्रोजेक्ट रिपोर्टही सादर करा, अशी सूचनाही दिली आहे. त्यामुळे रत्नागिरी महामार्ग विभाग टेंडर प्रक्रिया राबवून एजन्सी नेमण्याच्या तयारीत आहे.
केंद्राने २०१७ मध्ये संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दिली. त्याचे एनएच ५४८ असे नामकरणही केले. १०८ किलोमीटरच्या महामार्गासाठी सुरवातीला जवळपास दोन हजार कोटी रुपये मंजुरही केले होते. सुरवातीला या प्रकल्पाचे काम केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग अॅथॉरटी इंडीया या विभागाकडे होते; मात्र ते नंतर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले होते. चौपदरीकरणाचे नियोजन रद्द करत ते दुपदरी केले होते. संकेश्वर ते बांदा या महामार्गाबाबत सर्व्हे होताना तो केवळ बुर्डी पुलापर्यंतच झाला आहे. एकूण दोन टप्प्याच्या कामाचा हा सर्व्हे होता; मात्र आता आजरा फाटापर्यंत दुसरा टप्पा करुन पुढे तिसरा टप्पा फायनल केला आहे. या तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या बुर्डी पुल ते इन्सुली खामदेव नाकापर्यंत सर्व्हे म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट झाला नव्हता. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी शासनाची मंजुरीही आवश्यक होती. हा रिपोर्ट तयार होत नाही, तोपर्यंत हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरुन (रिंगरोड) जाणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम होते; मात्र हे गुढ लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण या तिसऱ्या टप्प्याचे काम आता कोल्हापुर महामार्ग विभागाकडून रत्नागिरी महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. लवकरच याबाबत एजन्शी नेमून शहरातून महामार्ग नेण्यासाठी सर्व्हेही होणार आहे. यामध्येच हा मार्ग शहरातून की बाहेरुन जाणार हे निश्चित होणार आहे.
-----------
चौकट
...तोपर्यंत काम अवघड
प्रारंभी हा मार्ग शहरातून जाणार की बावळट मार्गे बांद्याला जोडणार? असा संभ्रम होता; मात्र कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून याबाबत खुलासा करताना माजी आमदार शिवराम दळवी यांनी केलेल्या पत्राला उत्तर देत हा मार्ग सावंतवाडी शहरातून इन्सुली मार्गे बांद्याला जोडणार असल्याचे म्हटले होते. सावंतवाडी शहराचा विचार करता शहरातून हा महामार्ग नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाच करावा लागणार आहे. शिवाय येथील स्थिती लक्षात घेता जमिन हस्तांतरणाचाही प्रश्नही आहे. प्रस्तावित रिंग रोडबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. येथेही जमीन हस्तांतरणाची अडचण आहे. त्यामुळे जोपर्यत शहरातील अडचणीचे गणित सुटत नाही, तोपर्यंत हा रस्ता बुर्डी पुलापर्यतच अडकणार आहे. सद्यस्थितीत या महामार्गाच्या दोन टप्प्याचे काम सुरु झाले आहे. आजरा फाट्यापर्यत हे काम होणार आहे; मात्र तिसऱ्या टप्प्यातील अडथळे दुर होत नाहीत, तोपर्यंत बांद्यापर्यत हा मार्ग जोडणे अवघड होणार आहे.
--------------
बावळाट नाही, सावंतवाडीतूनच!
बांदा-संकेश्वर महामार्ग हा रस्ता बावळाट मार्गे नाही तर सावंतवडीतूनच जाणार आहे. शहरातून आणि शहराबाहेरुन असे दोन पर्याय आहेत; मात्र तो शहरातून नेण्यासाठी असणाऱ्या अडचणी आणि उपाय तसेच शहराबाहेरुन नेण्यासाठी असलेले पर्याय लक्षात घेता आपण स्वतः यात लक्ष घालणार असून लवकरच सावंतवाडीत येऊन आवश्यक माहिती घेणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
---
सावंतवाडीत येणाऱ्या अडचणी
* सावंतवाडी शहरात जमिन हस्तांतरणाचा प्रश्न
* प्रस्तावित रिंग रोडबाबत नागरिक न्यायालयात
* रिंगरोड जमिन हस्तातंरणाबाबत मंत्री दिपक केसरकरांनी घातले होते लक्ष
* सावंतवाडी पालिकेत बैठक घेऊन मुख्याधिकारी नगरसेवकांशी केली होती चर्चा
* रिंग रोड जमिन हस्तांतरणासाठी मोठ्या निधीची गरज
* योग्य मोबदला देण्याबाबत हालचाली नाहीत
--
कोट
पंधरा दिवसापूर्वीच कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाकडून रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बांदा-संकेश्वर महामार्गाच्या तिसऱ्या टप्पाचे काम वर्ग केले आहे. तिसऱ्या टप्प्यात अनेक अडथळे असून सर्व्हेतून आवश्यक प्रोजेक्ट रिपोर्ट शासनाकडे सादर केला जाणार आहे. यामध्येच हा मार्ग शहरातून की शहराबाहेरुन? हे स्पष्ट होईल.
- लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी