
कविता अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम
71282
एडगाव ः ‘हरविलेली कविता’च्या प्रकाशन प्रसंगी डॉ. नामदेव गवळी, अमित यादव, अरुण पाटील, कवी राजेंद्र पवार आदी.
कविता अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम
डॉ. नामदेव गवळी ः एडगाव येथे ‘हरविलेली कविता’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः कविता हा साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे सशक्त माध्यम म्हणून कवितेकडे पाहिले जाते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या घटना कवी आपल्या कवितेतून शब्दबद्ध करतो. कवितेत प्रचंड ताकद आहे. कवितेतून जीवन उमगते आणि समजते, असे मत मालवणी कवी डॉ. नामदेव गवळी यांनी येथे व्यक्त केले.
एडगाव येथील कवी राजेंद्र पवार यांच्या ‘हरविलेली कविता’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पवारवाडी उत्कर्ष मंडळातर्फे काल (ता. २६) सायकांळी खंडोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक अमित यादव, संत निरकांरीचे अरुण पाटील, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, महेश रावराणे, प्रकाश काळे, श्रीधर साळुंखे, नरेंद्र कोलते, उज्ज्वल नारकर, सरपंच रविना तांबे, उपसरपंच दत्ताराम पाष्टे, राजू पवार, भाई पवार आदी उपस्थित होते.
डॉ. गवळी म्हणाले, ‘‘कवी हा संवेदनशील असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वेध कवितेतून घेत असतो. निसर्ग, पर्यावरण, राजकारण, समाजकारण, शेती, शेतकरी व्यथा, महिलांच्या व्यथा याशिवाय पावलोपावली लोकांना जाणवणाऱ्या समस्या कवितेतून मांडत असतो. कवीच्या एखाद्या ओळीतून समाजात जागृती होत असते. पवारांच्या कवितेत भावनिक नात्यांची योग्य पध्दतीने गुंफण पाहायला मिळते. शिवाय त्यांनी सर्वच गोष्टींवर दृष्टीक्षेप टाकला आहे. त्यांच्यावर असलेल्या आध्यात्मिक संस्कारांचा संग देखील काव्यातून दिसून येतो. त्यामुळे ‘हरविलेली कविता’ हा परिपूर्ण काव्यसंग्रह ठरेल.’’ या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक यादव, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी चेतन बोडेकर यांनी, आभार भाई पवार यांनी मानले.
--
शालेय जीवनातच कवितेत
कवी राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘शालेय जीवनातच कवितेत रमलो; परंतु आपल्या मौल्यवान साहित्याला खोलीत भरलेल्या पुराच्या पाण्यात जलसमाधी मिळाली. त्यानंतर काहीसे नैराश्य आले; मात्र पत्नीने साथ दिली. प्रोत्साहन दिले. मित्रपरिवाराने दाद दिली. त्यामुळे पुन्हा लिहायला लागलो. त्यामुळे आजचा काव्यसग्रंह प्रकाशित होत आहे.’’