
चिपळूण ः 54 कोटीच्या पाणीयोजनेसाठी मिळेना ठेकेदार
rat२७p३०.jpg-
७१३३९
कोळकेवाडी धरण.
-----------
ठेकेदाराअभावी पाणीयोजना रखडली
- कोळकेवाडी प्रकल्पाची ५४ कोटीची निविदा; २७ गावांना पाण्याची प्रतीक्षा
चिपळूण, ता. २७ः चिपळूण व खेड तालुक्यातील २७ गावांना कोळकेवाडी धरणातून पाणी देण्यासाठी ५४ कोटीची पाणीयोजना तयार करण्यात आली. योजनेची निविदा पाचवेळा प्रसिद्ध करूनसुद्धा हे काम करण्यास कोणी एजन्सी तयार नाही त्यामुळे २७ गावांची पाणीयोजना रखडली आहे. ही योजना कशी मार्गी लावायची, असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासमोर आहे.
चिपळूण व खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी देण्याची मागणी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी केली होती. मागील साडेतीन वर्षापासून या योजनेसाठी दोन्ही आमदारांचा पाठपुरावा सुरू आहे.
चिपळूण तालुक्यातील कान्हे, पिंपळे खुर्द, चिंचघरी, सती, खे, कापसाळ, कामथे, मिरजोळी, कोंढे, शिरळ, पेढे, वालोपे, खांदाटपाली, दलवटणे, वालोटी, खडपोली कालुसते, करजीकर मोहल्ला या टंचाईग्रस्त गावांना कोळकेवाडी धरणातून पाणी देण्याची योजना आहे. त्या शिवाय खेड तालुक्यातील काडवली, गाजवेवाडी, नवीन कोळकेवाडी, आंबडस, चिरणी, लोटे, धामणदेवी, भेलसई या गावांना कोळकेवाडी धरणातून पाणी देण्याची योजना आहे. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीयोजनेसाठी कोळकेवाडी धरणातून पाणी देण्यास मंजुरी दिली होती; मात्र भौगोलिकदृष्ट्या ही योजना करणे शक्य आहे का याबाबतचा अहवाल पुणे येथील मॉर्डन सर्वे कन्सल्टन्सी या कंपनीकडून मागवला होता. या कंपनीने सकारात्मक अहवाल दिल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत योजनेचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्याची सूचना तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. कोळकेवाडी धरणातून आउटलेट काढून मुख्य जलवाहिनी टाकणे आणि त्या जलवाहिनीवर टॅब मारून २७ गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्याची योजना तयार आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने ५४ कोटीचे अंदाजपत्रक तयार केले. या कामाची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली; परंतु या कामाला कोणत्याही एजन्सीने प्रसिद्ध दिला नाही. तब्बल पाचवेळा निविदा प्रसिद्ध करूनसुद्धा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता ही योजना कशी करायची, असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासमोर आहे.
-------
कोट
चिपळूण व खेड तालुक्यातील २७ गावांना कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी देण्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तयार केली आहे. अनेकवेळा निविदा प्रसिद्ध करूनसुद्धा एजन्सीकडून प्रतिसाद मिळत नाही. नजीकच्या काळात तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- यु. एल. जाधव, प्रभारी उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चिपळूण.