
यशप्राप्तीसाठी हवेत अथक प्रयत्न
71384
मठ ः विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.
यशप्राप्तीसाठी हवेत अथक प्रयत्न
एन. पी. मठकर ः डॉ. खानोलकर हायस्कूलचे मठमध्ये स्नेहसंमेलन
वेंगुर्ले, ता. २७ ः एका प्रयत्नात सर्व प्राप्त होईल, असे नाही. म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. हार न मानता जास्तीत जास्त प्रयत्न करून यश संपादन करा आणि भविष्यात शाळेमध्ये सन्मानाने येण्याचा मान मिळवा, असे प्रतिपादन जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक एन. पी. मठकर यांनी केले.
मठ येथील रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच झाला. याच दिवशी रायसाहेब डॉ. खानोलकर यांची जयंती साजरी केली. हायस्कूलच्या नवीन इमारतीमधील रायसाहेब मधुसूदन खानोलकर सभागृहात सकाळच्या सत्रात रायसाहेब डॉ. खानोलकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. खानोलकर यांच्या जीवनाचा आढावा घेणारी भाषणे सादर केली. सरपंच तुळशीदास ठाकूर, नवनिर्वाचित सदस्य नित्यानंद शेणई, मिलिंद खानोलकर, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनीही डॉ. खानोलकर यांच्या जीवनावर भाषणे केली.
सायंकाळी काजू उद्योजक दीपक ठाकूर, सरपंच ठाकूर, श्रीकृष्ण खानोलकर, मिलिंद खानोलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष समीर गडेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सतीश गावडे, नूतन मराठा हितवर्धक संघाचे सदस्य वसंत परुळेकर, रामदास खानोलकर, मिहिर खानोलकर, शालेय मुख्यमंत्री ईशा ठाकूर यांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण झाले. यावेळी आठवी ते दहावीमधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त, चालू वर्षातील शाळांतर्गत विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एकूण ४ हजार ७५० रुपयांची ही पारितोषिके दीपक ठाकूर यांनी पुरस्कृत केली होती. आदर्श विद्यार्थी व आदर्श क्रीडापटू यांनाही सन्मानचिन्ह व खेळाडूंना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. अहवालवाचन एस. बी. कांबळी, सूत्रसंचालन जी. एम. गोसावी यांनी केले. आभार डी. ए. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल वाढोकार, दिगंबर मोबारकर, नरेंद्र नाईक, अनिकेत कांबळे आदींनी सहकार्य केले. त्यानंतर मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम झाले.