पान एक-सिंधुदुर्गात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सिंधुदुर्गात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला
पान एक-सिंधुदुर्गात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला

पान एक-सिंधुदुर्गात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला

sakal_logo
By

सिंधुदुर्गात वाढला लम्पीचा प्रादुर्भाव

३६ जनावरे दगावली; कुडाळ, कणकवलीत सर्वाधिक प्रभाव


सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः जिल्ह्यात पाळीव जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत गायवर्गीय १०४७ जनावरे लम्पीने बाधित झाली असून ३६ जनावरे मृत झाली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी आज दिली.
जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत पशुधनाला ‘लम्पी’ आजाराची लागण सुरू झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४७ जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. त्यांच्यावरील उपचाराने ५४३ जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. अन्य जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत यात दगावलेल्या ३६ पैकी ९ जनावरांच्या मालकांना नुकसानीपोटी १ लाख ९८ हजार एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित मृत जनावरांचे मूल्यांकन करून त्यांनाही अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कुडाळ व कणकवली तालुक्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव अधिक आहे. तालुकानिहाय आढावा घेतला असता सावंतवाडी तालुक्यात १६८, दोडामार्ग १०३, कणकवली २१३, मालवण ९७, वैभववाडी ६१, कुडाळ २७७, देवगड ५२, तर वेंगुर्ले तालुक्यात ७६ जनावरे या अजाराने बाधित सापडली आहेत. जिल्ह्यात लम्पीच्या प्रादुर्भावाने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रादुर्भावाला मुख्यत्वे कारणीभूत असलेल्या बाह्यकिटकांची (गोचिड, गोमाशा, डास, चिलटे आदी कीटक) वातावरणातील संभाव्य बदलामुळे आगामी कालावधीत वाढणारी संख्या विचारात घेता, या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ४ ऑगस्टपासून ज्या शेतकरी, पशुपालकांकडील पशुधनाचा मृत्यू झाला आहे, अशा शेतकरी, पशुपालकांना शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे मदत देण्यात येते. त्यामध्ये दुधाळ जनावरे (गाय) या आजारात मृत पावल्यास ३० हजार, ओढकाम करणारी जनावरे (बैल) मृत पावल्यास २५ हजार, तर वासरे मृत पावल्यास १६ हजार रुपयांची मदत देण्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
................
जिल्ह्यातील पशुधन
गोवर्णीय पशुधन - १ लाख ५ हजार ५०८
‘गोट पॉक्स’ लसीकरण- १ लाख २ हजार ५३९
एकूण लस प्राप्त - १ लाख ५ हजार ९००
लम्पी बाधित जनावरे - १०४७
पूर्णपणे बरी जनावरे - ५४३
दगावलेली जनावरे - ३६


कोट
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपली जनावरे या आजाराला बळी पडू नयेत, यासाठी पशुपालकांनी ‘लम्पी’ची लक्षणे दिसताच आपल्या जनावरांवर तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत.
- डॉ. विद्यानंद देसाई, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद