
मुंबई ते पणजी ‘शिवशाही’ सेवा
मुंबई ते पणजी ‘शिवशाही’ सेवा
कणकवली ः एसटी महामंडळाने मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना एक हजार २४५ रुपयांत मुंबईहून पणजी गाठता येणार आहे. ही सेवा २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. नववर्षानिमित्त प्रवाशांसाठी ही भेट ठरली आहे. यंदा वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी घराबाहेर नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत. यात कोकण-गोव्याला प्राधान्य आहे. यामुळे या मार्गावरील मागणी लक्षात घेता एसटी महामंडळाने वातानुकूलीत शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-गोवा मार्गावर गोवा राज्य परिवहन महामंडळाची ‘कदंब’ ही सेवा सुरू आहे. तिचे प्रतिप्रवासी भाडे एक हजार २५० इतके आहे. या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. सलग सुट्यांमुळे खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या आरामदायी ‘शिवशाही’चा पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटी आगारासहब''एमएसआरटीसी’ मोबाइल अॅपवरूनही करता येईल. ही बस पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी या स्थानकात थांबणार आहे. मुंबई सेंट्रलहून दुपारी साडेचारला ही बस सुटून पणजीमध्ये सकाळी सातला पोहचते.