
आरे फाटा येथे आजपासून ‘गुरुदास आनंद सोहळा’
71605
चंद्रकांत कदम
आरे फाटा येथे आजपासून
‘गुरुदास आनंद सोहळा’
चंद्रकांत कदम स्मृतीदिनानिमित्त आयोजन
मुणगे, ता. २८ ः गुरुदास चौक आरे फाटा (ता. देवगड) येथे २९ व ३० ला ‘गुरुदास आनंद सोहळा २०२२’ कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बुवा लक्ष्मण गुरव यांच्या अध्यक्षतेखाली केले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त ‘कोकणकला भूषण’ भजनसम्राट (कै.) चंद्रकांत कदम (गुरुदास) यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संपूर्ण गुरुदास शिष्य परिवार आणि आरे-वळीवंडे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदास चौक, आरेफाटा येथे हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विशाल परब, निवेदक म्हणून राजा सामंत उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (ता. २९) सायंकाळी पाचला उद्घाटन, ५.१० ला जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी सातला स्मारकाजवळ (आरे फाटा) गणेशपूजन, पावणे आठला भजन-संगीतकार दीप्तेश मेस्त्री यांचे गायन, नऊला पालखी मिरवणुकीस प्रारंभ (पालखीचे ‘गुरुदास’ यांच्या आरे येथील निवासस्थानातून प्रस्थान होणार आहे.), पावणे बाराला गुरुदास स्मारक आरे फाटा येथे आगमन, दुपारी बाराला मान्यवरांचा सत्कार, दिंडी भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण व आभार प्रदर्शन, एकला स्नेहभोजन, संगीतमय वातावरणात पालखी मिरवणूक होणार आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष बुवा लक्ष्मण गुरव, उपाध्यक्ष बुवा भगवान लोकरे, सचिव बुवा रवींद्र लाड यांनी केले आहे.