आचरा बायपासला तूर्त खो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा बायपासला तूर्त खो
आचरा बायपासला तूर्त खो

आचरा बायपासला तूर्त खो

sakal_logo
By

71623
कणकवली ः पर्यायी आचरा रस्त्याचा प्रश्‍न सुटत नसल्‍याने कणकवली-कलमठ मार्गावर वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

आचरा बायपासला तूर्त ‘खो’

पोस्ट खात्याच्या जमिनीचा प्रश्न; मोबदला स्वीकारण्यास मंजूरीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ ः गेली बारा वर्षे रखडलेला कणकवली आशिये, कलमठ, वरवडे असा आचरा बायपास रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीने भूसंपादन प्रक्रिया राबवली; मात्र, भूसंपादनाचा मोबदला स्वीकारण्याबाबत पोस्टखात्‍याकडून मंजूरी मिळालेली नाही. पोस्ट खात्‍याच्या नवी दिल्‍ली येथील कार्यालयाकडून याबाबत कार्यवाही होणे शिल्‍लक आहे. मात्र, त्‍यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता असल्‍याने आचरा पर्यायी रस्त्याला पुन्हा एकदा ‘खो’ बसला आहे.

वाहतूक कोंडीची समस्या
कणकवली-आचरा मार्गावरील शहरातील पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठ या हद्दीमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते. कणकवली आचरा रस्त्याला कलमठ, वरवडे, पिसेकामते, बिडवाडी, रामगड, आडवली, मालडी, श्रावण, बेळणे, पळसंब, चिंदर, त्रिंबक आदी अनेक गावे जोडली गेली आहेत. यात कणकवली शहर ते कलमठ हद्दीपर्यंतचा रस्ता कमी रुंदीचा असल्याने, तसेच या मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असल्याने प्रत्येक मिनिटाला वाहतूक कोंडी होत असते.

पोस्ट खात्याची मंजूरी नाही
कणकवली पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठ या रस्ता दुतर्फा दुकाने आणि घरे असल्‍याने रूंदीकरण शक्‍य नव्हते. त्‍यामुळे वरवडे, कलमठ, आशिये ते कणकवली अशा नव्या पर्यायी रस्त्याची आखणी पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आली. तर २००६ मध्ये या रस्ता कामाला मंजूरी मिळाली. त्‍यानंतर रस्त्याचे सपाटीकरण, खडीकरण आदी कामे सुरू आहेत. आचरा मार्गावरील वरवडे चव्हाण दुकान ते कणकवली शहर हद्दीतील बसस्थानकाच्या मागील बाजूपर्यंतचे भूसंपादन पूर्ण झाले आहे; मात्र, त्‍यापुढील दोनशे फुटाचा रस्ता हा पोस्ट खात्‍याच्या जागेतून जातो आणि मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्गाला येऊन मिळतो. मात्र, पोस्ट खात्‍याने या रस्ता जागेसाठी अद्यापही मंजूरी दिलेली नाही.

क्षेत्र नगरपंचायतीकडे वर्ग नाही
कणकवली बसस्थानकालगत पोस्ट खात्‍याने चाळीस वर्षापूर्वीच जागा विकत घेतली. तर २०१० मध्ये सुमारे एक कोटीचा निधी मंजूर झाल्‍यानंतर पोस्ट खात्‍याची इमारत उभी करण्यासाठी नगरपंचायतीकडे परवानगी अर्ज केला. त्‍यावेळी नगरपंचायतीने पोस्ट खात्‍याच्या जागेमधून जात असलेल्‍या डीपी रस्त्यासाठीचे क्षेत्र नगरपंचायतीकडे वर्ग करण्याची अट घातली होती. ही अट पूर्ण झाल्‍यानंतरच पोस्ट खात्‍याच्या इमारतीला मंजूरी दिली जाणार होती. परंतु, पोस्ट खात्‍याने अद्यापही रस्त्यासाठीचे क्षेत्र नगरपंचायतीकडे वर्ग केले नाही. त्‍यामुळे डीपी रस्ता नाही आणि पोस्ट खात्‍याची इमारत देखील उभी राहिलेली नाही.

दहा वर्षे पत्रव्यवहार, तरीही...
गेली दहा वर्षे पोस्ट खात्‍याकडे पत्र व्यवहार करूनही रस्त्यासाठी आवश्‍यक ते क्षेत्र वर्ग केले जात नव्हते. त्‍यामुळे नगरपंचायत प्रशासनाने ही जागा भूसंपादन करून ताब्‍यात घेण्याचा ठराव केला. त्‍यानुसार भूसंपादन विभागाकडे १० लाखांची मोबदला रक्‍कमही वर्ग केली. यानंतर भूसंपादन विभागाने पोस्ट खात्‍याकडे मोबदला रक्‍कम स्वीकारून जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला; मात्र, हे अधिकार पोस्ट खात्‍याच्या दिल्‍ली येथील मुख्य कार्यालयाकडे असल्‍याचे सांगून सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने भूसंपादन विभागाचा हा प्रस्ताव दिल्‍लीतील कार्यालयात पाठवला. गेले सहा महिने पोस्ट खात्‍याकडून याबाबत काहीही उत्तर येत नसल्‍याने आचरा पर्यायी रस्त्याला पुन्हा एकदा ‘खो’ बसला आहे. याबाबत संबंधितांकडून निर्णय अपेक्षित आहेत.
--------
चौकट
आशिये, कलमठचा विकासही रखडला
नव्या पर्यायी रस्त्याला मंजूरी मिळाल्यानंतर अनेक उद्योग व्यावसायिकांनी नव्या पर्यायी आचरा रस्त्यालगत जमीनी घेतल्या होत्या. अनेक संकुलांच्या उभारणीसाठीही बिल्‍डर्सनी प्रस्ताव तयार केले होते. नवा रस्ता तयार झाला असता तर त्‍यालगत नवी बाजारपेठ तयार होऊन कणकवलीसह आशिये, कलमठ आणि वरवडे येथील विकासाला चालना मिळणार होती. मात्र, रस्ता पूर्णत्‍वास जात नसल्‍याने येथील विकासही रखडला आहे.
---------
चौकट
कणकवली, कलमठ रस्त्याला ग्रामीणचा दर्जा
नव्या पर्यायी रस्त्याला मंजूरी मिळाल्‍यानंतर कणकवली पटवर्धन चौक ते कलमठ हद्दीपर्यंत असणारा प्रमुख जिल्‍हा मार्ग हा दर्जा काढून तेथे ग्रामीण रस्त्याचा दर्जा देण्यात आला आहे. ग्रामीण दर्जा झाल्‍याने रस्त्यापासून दुकाने, घरे उभारणीची अटही शिथील झाली. परिणामी गेल्‍या दहा वर्षात या रस्त्यालगत नव्याने दुकाने उभी राहिली. रस्ता अरूंद असल्‍याने वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न कायम राहिला आहे.
-----------
कोट
पोस्ट खात्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी नगरपंचायतीला जुमानत नसल्‍याने पोस्ट खात्‍याच्या जागेतील रस्त्याचा प्रश्‍न केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडला आहे. पुढील महिन्यात पोस्टाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची बैठकही श्री. राणे यांनी नवी दिल्‍ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पोस्ट खात्‍याकडून सकारात्मक भूमिका आणि भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
- बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष, कणकवली