
फसवणूक टाळण्यासाठी सजग राहा
71654
जामसंडे ः येथे झालेल्या कार्यक्रमात दादासाहेब गीते यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
फसवणूक टाळण्यासाठी सजग राहा
जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते; देवगडमध्ये राष्ट्रीय ग्राहकदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः बाजारातील संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग झाले पाहिजे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी येथे केले. जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहकदिन कार्यक्रमात गीते बोलत होते.
मंचावर जिल्हा पुरवठा विभागातील बी. टी. मांजरेकर, पुरवठा निरीक्षक (कुडाळ) एन. एन. एडके, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, ग्राहक पंचायतीचे प्रा. सुरेश पाटील, लक्ष्मण पाताडे, नामदेव जाधव, सामीया चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून ग्राहक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. यासाठी कृष्णा मसगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. पाटील यांनी व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होता नये. प्रामाणिपणे व्यवसाय झाला पाहिजे. ग्राहक पंचायत व्यापार्यांच्या विरोधात नाहीच मात्र ग्राहकांवरील अन्याय, अत्याचार, फसवणूक यासाठी ग्राहकांच्या पाठीशी आहे. दुकान, हॉटेलमध्ये दरपत्रक असणे हा ग्राहकांचा अधिकार आहे. बाजारात फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहक साक्षर झाला पाहिजे. ग्राहक सजग असतील तर फसवणूक होणार नाही. ग्राहकांनी बिल घेतले पाहिजे. ग्राहकांनी आपली कर्तव्ये जपावीत, असे सांगितले. पोलिस निरीक्षक बगळे यांनी, ग्राहक आणि विक्रेता यामध्ये पोलिसांची तशी कोणतीही भूमिका येत नाही. तरीही काही अप्रिय किंवा असुरक्षित बाब असली की पोलिसांकडे धाव घेतली जाते. ऑनलाईन खरेदी आणि त्यातून होणारी फसवणूक यापासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी ढेपे यांनी कृषिविषयक योजना आणि त्यातील ग्राहक व विक्रेता यांचे संबध याबाबत मार्गदर्शन केले. प्रकाश रोकडे यांनी घरगुती गॅस वापरातील ग्राहक जागरूकता तसेच गॅस सुरक्षितता याविषयी माहिती दिली. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले.
.....................
चौकट
निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
यानिमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे (विषय ः जागो ग्राहक जागो) कोमल पाताडे (कासार्डे), मानसी मेस्त्री (देवगड), साहिल कासार (सावंतवाडी), महाविद्यालयीन गटात अनुक्रमे (विषय ः आभासी (ऑनलाईन) बाजारपेठ आणि ग्राहक) प्रफुल्ली दळवी (वैभववाडी), रुचिता दळवी (सांगुळवाडी), शांभवी कुळकर्णी (कणकवली), तर खुल्या गटात अनुक्रमे (विषय ः अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू-ग्राहक), पांडुरंग दळवी (वेंगुर्ले), नागेश कदम (मालवण), स्वरुपा पांगळे (सांगुळवाडी) यांनी यश मिळविले.