चिपळूण-ठाकरी समाजाने जोपासलेल्या चित्रांचा संग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-ठाकरी समाजाने जोपासलेल्या चित्रांचा संग्रह
चिपळूण-ठाकरी समाजाने जोपासलेल्या चित्रांचा संग्रह

चिपळूण-ठाकरी समाजाने जोपासलेल्या चित्रांचा संग्रह

sakal_logo
By

rat२८p२१.jpg
७१५८७
चिपळूणः अलोरे येथील सीए वसंत लाड कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संवाद साधताना परशुराम गंगावणे.
---

ठाकरी समाजाने जोपासलेल्या चित्रांचा संग्रह

परशुराम गंगावणे ; पद्मश्रींनी उलगडला चित्रकथी लोककलेचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २८ ः पूर्वीच्या काळापासून ठाकर समाजानेच जोपासलेल्या एक हजाराहून चित्रांचा संग्रह आम्ही केला आहे. प्रत्येक जुन्या पिढीकडून नव्या पिढीने चित्रे घेतली आणि ती नव्याने रंगवली. त्यामुळे परंपरेने हजाराहून अधिक चित्रे संकलित झाली आहेत. अशा जुन्या चित्रांना लक्षावधीचे मोल येत असले तरी आम्ही ती विकली नाहीत. त्यामुळेच त्यांचा संग्रह झाला आहे, असे परशुराम गंगावणे यांनी सांगितले.
अलोरे येथील एन. एच. देशपांडे स्मृतीविचार मंचावर श्रेणीयुक्त कार्यक्रमात चर्चा गटांअंतर्गत अकरावी-बारावीच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांशी ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी ठाकर समाजाने शतकानुशतके जोपासलेल्या चित्रकथी लोककलेचा प्रवास उलगडला. मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी गंगावणे यांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गंगावणे यांना लोककलेविषयी विविध प्रश्न विचारले. त्याला गंगावणे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. त्यातूनच साडेतीनशे वर्षांच्या लोककलेचा प्रवास उलगडला. आदिवासी कलांचे संगोपन करावे असे का वाटले, असे एका विद्यार्थिनीने विचारले. त्यावर ते म्हणाले, पूर्वजांनी जपलेली ही कला मी पुढे चालवत आहे. अवघ्या बाराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. तेव्हा मला अधिक शिक्षण घेता आले नाही; पण तबला-पेटी वाजवणे मला अवगत होतेच. त्यालाच जोडून गेय स्वरूपात चित्रकथी सांगायला मी सुरवात केली. चित्रकथीमध्ये प्रामुख्याने रामायणातील कथांची चित्रे असतात. त्यावर आधारित गाणी म्हटली जातात. त्याला ठाकर परंपरेची जोड मी दिली. याच कलेची जोपासना करण्यासाठी आदिवासी ठाकर कलांगण २००४ ला साकारले आहे.
या कलांगणमध्ये कोणकोणत्या कला आहेत, असे एका विद्यार्थिनीने विचारले असता पद्मश्री म्हणाले, प्रामुख्याने ११ कलांची जोपासना तेथे केली आहे. त्यापैकी कळसुत्री बाहुली, चित्रकथी आणि चामड्याच्या बाहुल्यांचा उल्लेख करता येईल. या कला जोपसताना पानाफुलांचे नैसर्गिक रंग, साळिंदरसारख्या प्राण्याच्या काट्यांचा केलेला उपयोग कसा केला, पिंपळाच्या पानांचा आणि त्यानंतर कागदाचा उपयोग कसा केला, रंग टिकवण्यासाठी काजूच्या डिंकाचा केलेला उपयोग या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
आपल्या परंपरांची माहिती पुढच्या पिढीलाही होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आदिवासी ठाकर कलाआंगण प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन गंगावणे पिता-पुत्रांनी केले.

ठाकरी भाषेचा वापर करून हेरगिरी

छत्रपती शिवरायांच्या काळात हेरगिरीचे कामही ठाकर समाजाने केले होते, असे गंगावणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ती नेमकी कशी, असे विचारता गंगावणे यांचे आयटी इंजिनिअर पुत्र चेतन गंगावणे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या काळात देशात मोगलांची सत्ता होती. त्यांच्याकडूनच हल्ले होत असत. अशा काळात लोककला सादर करताना सांकेतिक आणि स्थानिक विशिष्ठ ठाकरी भाषेचा वापर करून हेरगिरी केली जात असे. ठाकर समाजातील लोक लोककला सादर करतात, त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही, असेच मोगलांना वाटत असे. याचाच खुबीने उपयोग करून घेऊन ठाकर समाजाने शिवरायांना मदत केली. त्यामुळेच त्यांच्या काळात ठाकर समाजाला आणि त्यांच्या कलेला राजाश्रय मिळाला.