
रत्नागिरी-मिऱ्या-नागपूर मार्गावरील अतिक्रमणे हटविणार
मिऱ्या-नागपूर मार्गावरील
अतिक्रमणे हटविणार
बांधकाम विभाग पोलिसांना देणार पत्र
रत्नागिरी, ता. २८ः मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची निविदा निघाल्यानंतर आता ठेकेदारही निश्चित केला आहे. या मार्गावर जी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे झाली आहेत ती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काही दिवसांत हटवण्यात येणार आहेत. या कामाची जबाबदारी असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली.
रत्नागिरीतील चंपक मैदान ते साळवी स्टॉप आणि साळवी स्टॉप ते हातखंबा मार्गावरील जी अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा दिल्या आहेत. सुमारे दीडशेपेक्षा अधिक नोटिसा बजावल्या आहेत. या मार्गाच्या रूंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आता ठेकेदार निश्चित झाला आहे. या मार्गावर साळवी स्टॉप परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी काही लोकप्रतिनिधींची आहेत. ते त्याची भाडेसुद्धा घेत असल्याची चर्चा आहे. तेथे वीजपुरवठा, वातानुकूलित यंत्रणाही आहे. या सर्वांना पुन्हा एक नोटीस देऊन पोलिस बंदोबस्तात ती हटवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. काही अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे असणाऱ्या जागांनाही नुकसान भरपाई दिली गेली असल्याची चर्चा आहे. या प्रकाराचीही येत्या काळात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.