
पान एक-टोली माफी नसल्यास नाका खारेपाटणला हलवा
swt2832.jpg मध्ये फोटो आहे.
कणकवली ः येथील टोलमुक्त संघर्ष समितीच्या बैठकीत नितीन वाळके यांनी भूमिका मांडली.
टीपः swt2833.jpg मध्ये फोटो आहे.
कणकवली ः टोल नाका रद्द व्हावा, यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
टोल माफी नसल्यास नाका खारेपाटणला हलवा
लोकप्रतिनिधींसह नागरिकांची मागणी; कणकवलीतील बैठकीत लढा तीव्र करण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ ः जिल्ह्यातील सर्व वाहनांना टोलमाफी द्या किंवा ओसरगाव येथील टोल नाका सिंधुदुर्गच्या सीमेवरील खारेपाटणला हलवा, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, तसेच नागरिकांनी केली. जिल्ह्यातील खारेपाटण ते झाराप या दरम्यान प्रवासासाठी अन्य पर्यायी मार्ग नाही. जुन्याच महामार्गाची दुरुस्ती करून नवा मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही टोल देणार नाही. तीव्र आंदोलन करून टोलमाफी करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असा निर्धारही आज व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि विविध संस्था, संघटनांच्या वतीने टोल माफीसाठी लढा देण्याच्या अनुषंगाने कणकवलीत बैठक झाली. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात झालेल्या या बैठकीला टोलमुक्त संघर्ष समिती अध्यक्ष सतीश लळीत, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, विलास कोरगावकर, अशोक करंबेळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
व्यापारी महासंघाचे कार्यवाह वाळके यांनी ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोल माफी मिळायला हवी. या अनुषंगाने भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘राज्य तथा केंद्राने राज्यात नवीन महामार्ग उभे केले आहेत. त्यामुळे ज्यांना टोल भरायचा नाही, ते जुन्या महामार्गावरून प्रवास करू शकतात. मात्र, सिंधुदुर्गात तशी सुविधा नाही. जुन्याच महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. महामार्गाला पर्यायी रस्ता नाही. तालुकांतर्गत प्रवासासाठी टोल भरणे ही बाब अनैसर्गिक आहे. त्यामुळे नियोजित ओसरगाव येथील पथकर वसुली नाक्यावर पथकराची आकारणी केली जाऊ नये, किंवा येथील वसुली नाका खारेपाटणच्या सीमेवर हलवावा, असा एकमुखी ठराव करत आहोत.’
आजच्या बैठकीत नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर, हॉटेलमालक संघटनेचे राजन नाईक, बसपचे श्री. धामापूरकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेनेचे सुजित जाधव यांच्यासह अनेकांनी टोलमुक्तीसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. टोलमुक्त संघर्ष समितीच्या वतीने लढा देण्यासाठी कोअर कमिटी निश्चित करण्यासाठी नाव नोंदणी केली. या कोअर कमिटीच्या वतीने लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीत विविध प्रतिनिधींनी आपल्या भूमिका मांडल्या. त्या अशा
सिंधुदुर्गात दररोज शेकडो वाहने तालुकांतर्गत प्रवास करतात. या वाहनचालकांनी पथकराचा भुर्दंड सहन का करायचा? आम्ही पंधरा वर्षे रोड टॅक्स भरतोय. वाहनात डिझेल भरतात सेस करही द्यावा लागतोय. त्यामुळे आणखी पथकर देणे आम्हाला योग्य वाटत नाही.
- मनोज वालावलकर, सचिव, टोलमुक्त संघर्ष समिती
----------
एसटी गाड्यांनाही टोल भरावा लागणार आहे. टोलची ही रक्कम शेवटी प्रवाशांकडूनच वसूल केली जाणार आहे. त्यामुळे टोलचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. त्यामुळे टोलमुक्त सिंधुदुर्ग आंदोलनात प्रत्येक जिल्हावासीयांने सहभाग द्यायला हवा, तरच तीव्र संघर्ष उभा राहील.
- महेश परुळेकर, प्रतिनिधी, वंचित बहुजन आघाडी
-----------
केंद्राने तीस वर्षांपूर्वीच टोलचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे ओसरगाव टोल नाक्यावर टोलमाफी मिळणार आहे. मात्र, सर्व जनतेने आणि राजकीय पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संघर्ष केला तरच कोल्हापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचीही टोलमधून सुटका होऊ शकते. त्यासाठीच्या संघर्षाला प्रत्येकाने तयार राहायला हवे.
- इर्शाद शेख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
------------
नाशिकमधील चाळकवाडी येथील टोल नाका स्थानिकांनी आंदोलन करून बंद पाडला आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होऊ न देण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली आहे. ज्यावेळी ओसरगाव येथील टोल नाक्यावरून वसुली सुरू होईल, त्यावेळी आम्ही आंदोलन करणार आहोत.
- अबिद नाईक, नगरसेवक, राष्ट्रवादी
-------------
खारेपाटण ते झारापपर्यंतच्या प्रवासासाठी अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. अशावेळी जिल्ह्याच्या मध्यवर्ती टोल नाका उभारून वाहनचालकांची लूट करणे ही बाब योग्य नाही. त्यासाठी न्यायालयात लढाई करावी लागेल. या लढ्यासाठी ट्रक मोटर संघटनेच्या वतीने आम्ही एक लाखाचे आर्थिक साहाय्य करत आहोत. याखेरीज ज्यावेळी आंदोलन असेल त्यावेळी आमचे ७० ट्रक आणि शंभरहून अधिक कार्यकर्ते आंदोलनस्थळी असणार आहेत.
- राजन बोभाटे, अध्यक्ष, ट्रक मोटारमालक संघटना
-------------
राजकीय नेतेमंडळींना टोल नाक्यावर असलेली टोलमाफी आधी रद्द व्हायला हवी. टोलमुक्त लढ्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या सरपंचांना सहभागी करून घ्यायला हवे. याखेरीज टोलविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातून जनहित याचिका दाखल झाली असून, त्यात सिंधुदुर्ग टोलमुक्ती संघर्ष समितीनेही सहभागी व्हावे.
- अॅड. किशोर शिरोडकर
-------------
कोल्हापूरचा टोल माफ झालेला नाही, तर तेथील पथकराची रक्कम संपूर्ण महाराष्ट्राला भरावी लागतेय. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर ओसरगाव टोल नाका बंद करायचा असेल, तर संपूर्ण सिंधुदुर्गातून तीव्र जनआंदोलन उभे राहायला हवे. मात्र, तेवढा उठाव सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे ओसरगाव येथील टोल नाका खारेपाटण सीमेवर हलविणे हा एक पर्याय आहे.
- रविकिरण तोरसकर, मच्छीमार नेते