
तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी
तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी
पृथ्वीराज चव्हाण यांचे मत; संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन
पुणे, ता. २८ : “मराठा आरक्षण तर हवेच. पण, आरक्षणाची वाट न पाहता तरुणांनी शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करावा. शेतकरी असाल तर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी किती राहतील, याबाबत शंका आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करणारे उद्योजक होणे आवश्यक आहे,” असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खासदार श्रीनिवास पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, लेखक अरविंद जगताप, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, युवराज संभाजीराजे भोसले, सुधीर भोसले उपस्थित होते. या वेळी अभिनेते भरत जाधव यांना ‘विश्वभूषण जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले तर अभिनेते अशोक समर्थ यांचाही सन्मान करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, ‘‘एका बाजूला अर्थकारण, तर दुसऱ्या बाजूला सर्वांगीण विकास हा महत्त्वाचा आहे. तरच आपण व्यापार, उद्योग यशस्वी करू शकतो. जगाच्या तुलनेत अमेरिका, चीन यांचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. त्यातुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न २४७० डॉलर एवढे कमी आहे. हे वाढवीत असताना भारताचा ‘जीडीपी’ दरवर्षी ९-१० टक्क्यांनी वाढला पाहिजे. तरच आपण इतर देशाच्या तुलनेत पुढे जाणार आहोत.”
पाटील म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेडमध्ये तोडणारे नसून जोडणारी लोक आहेत. त्यासाठी आरक्षण हा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. पण तरुणांनी गैरसमज करून घेऊ नये. पूर्वीच्या काळीही तरुणांना शिक्षण हे मिळालेच आहे, ते या पुढेही मिळणार आहे.’’
गायकवाड म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेड ही केडरबेस संघटना आहे, असे ओळखले जात होते, पण तशी ही संघटना नाही. राज्यात २०१६ मध्ये मराठा क्रांती मोर्चा शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने निघाला. त्यानंतर ठोक मोर्चे निघाले. आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी ४२ लोकांनी आत्महत्या केल्या. आरक्षणाने प्रश्न सुटले नाहीत, तर अनेक प्रश्न उपस्थित राहिले. लॉकडाउनमुळे तरुणांना अर्थकारण कळायला लागले. नवी दिशा, नवा विचार देण्यासाठी पहिले अधिवेशन घेतले आहे. अर्थकारण बदलायला लागले आहे, खासगीकरण, उदारीकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. पण, त्याकडे आम्ही आशेने बघतो.’’
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी प्रास्ताविक केले. हर्षवर्धन मगदूम यांनी आभार मानले.
संभाजी ब्रिगेडचे धोरण महत्त्वाचे
“मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी अनेकांनी विरोध केला होता. परंतु अल्पभूधारक शेतकरी, कामगार डोळ्यासमोर ठेऊन मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. बारकाईने अभ्यास केल्यानंतर आरक्षणाची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर राणे समिती नेमली. त्यानंतरच्या टप्प्यात सरकार बदलल्यानंतर हे आरक्षण रद्द झाले, परंतु पुन्हा आरक्षण देण्यासाठी वकिलांची टीम तयार करून लढा देण्यासाठी काम करत आहे. त्याला किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने घेतलेले धोरण महत्त्वाचे आहे,’’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
विकासाची बदलती सूत्रे
‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘भारताने उदारीकरण, अर्थकारण, खासगीकरणला बळ दिले पाहिजे. चीनची प्रगती अफाट असून नवीन तंत्रज्ञान घेऊन उपयोग केला. सध्या विकासाची सूत्रे बदलत आहेत. त्यामुळे तरुणांचे नवीन प्रश्न तयार होत आहेत. १० वर्षांनंतर ८० टक्के नोकऱ्या राहणार नाही. बांधकाम क्षेत्रात १० वर्षांनंतर मजुराची संख्या कमी होईल. कारण, रोबोटिक्स संकल्पना वाढत आहे. त्यामुळे पुढील १५ वर्षांत वेगाने विकास करावा लागेल. सेवा, कृषी क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून भविष्यात अनेक आव्हाने तयार होणार आहेत.”