
सावंतवाडीत आजपासून मिनी पर्यटन महोत्सव
swt२९१३.jpg
७१८१०
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना विनया बाड, बाबू कुडतरकर व अन्य
सावंतवाडीत आजपासून मिनी पर्यटन महोत्सव
तीन दिवस आयोजनः रोटरी क्लब, केसरकर मित्रमंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः येथील पालिकेतर्फे दरवर्षी होणारा सावंतवाडी पर्यटन महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. मात्र, याच धर्तीवर मिनी पर्यटन महोत्सव ‘उडान २०२२-२०२३’ चे आयोजन केले आहे. येथील रोटरी क्लब व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवउद्यान येथे उद्या (ता. ३०) पासून १ जानेवारी या तीन दिवसात याचे आयोजन केले आहे, अशी माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा विनया बाड आणि दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष बाबू कुडतरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात फूड फेस्टिव्हलसह मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून २५ हून अधिक फूड स्टॉल असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रोटरीचे सुधीर नाईक, मिहीर मठकर, प्रसन्ना शिरोडकर, अनघा रामाणे, पूर्वा निर्गुण, हर्षद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मावेश मिसे, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बाड म्हणाल्या, ‘‘या महोत्सवाचे उद्या (ता. ३०) माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी इचलकरंजी येथील कार्यक्रम तर अन्य दोन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. उद्या सायंकाळी सात वाजता मिनी पर्यटन महोत्सव ''उडान''चे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इचलकरंजी येथील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. ३१ ला सायंकाळी ७ वाजता स्थानिक तसेच विविध कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता मिनी महोत्सव उडाणचा समारोप व नव्या वर्षाचा जल्लोष कार्यक्रमही केला जाणार आहे. या तिन्ही दिवशी विविध स्तरातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा गौरव सोहळा होणार आहे.’’