
दंडाची रक्कम भरा अन्यथा जमिनी शासनाला समर्पण
rat२९३२.txt
(पान ५ साठी)
फोटो ओळी
-ratchl२९१.jpg ः
७१८८३
चिपळूण ः बोरगांव, कौंढरताम्हाणे परिसरातील चिरेखाणी. (संग्रहित)
---
दंड न भरल्यास जमिनी शासनाला समर्पण
२९ जणांना नोटीसा ; गौण खनिज उत्खनन
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २९ ः तालुक्यातील बोरगांव, कौंढरताम्हाणे, परिसरातील चिरेखाणींमधील गौण खनिज उत्खननप्रकरणी तहसीलदारांनी २९ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील अनेकांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे तहसीलदारांनी चौघांना पुन्हा दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसात रक्कम न भरल्यास संबंधितांच्या नावे असलेल्या त्यांच्या सर्व प्रकारच्या जमिनी शासनाला समर्पण करण्यात येतील, अशी ताकीद तहसीलदारांनी चौघांना नोटिसीद्वारे दिली आहे.
बोरगांव, कौंढरताम्हाणे व आजूबाजूच्या परिसरातील चिरेखाणींचा विषय गाजतो आहे. या भागातील अनधिकृत दगड खाणी आणि शासनाचा बुडीत महसूल याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर दत्ताराम साळुंखे हे संबधित खाणमालक आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रकरणी शासनास दखल घेण्यास भाग पडले आहे. काही महिन्यापूर्वी येथील तहसील कार्यालयामार्फत एटीस मशिनद्वारे मोजणी करून त्याचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार २९ खाणमालकांना जबाबदार धरून त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये सुरवातीला ५ खाणमालकांना नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी एका खाणमालकाने न्यायालयात धाव घेतली होती; मात्र उर्वरित ४ खाणमालकांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. परिणामी, आता संबंधित खाणमालकांच्या जमिनीवर शासकीय बोजा चढवण्याच्या हालचाली तहसीलदार कार्यालयाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी चौघांना १५ दिवसाची दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विक्रम विश्वनाथ साळुंखे यांना ४० लाख ९१ हजार ७८९ रुपये, सीताराम बाजी साळुंखे यांना २४ लाख ५० हजार ४ रुपये, संजय बाबू हुमणे यांना ६ लाख ३० हजार ४३५ रुपये, सतीश रघुनाथ इंदुलकर यांना ३५ लाख २ हजार ८२६ रुपये दंड आकारला आहे. उर्वरित खाणमालकांवरदेखील लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती तक्रारदार विद्याधर दत्ताराम साळुंखे यांनी दिली. या भागातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.