खेड-परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा वेग मंदावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा वेग मंदावला
खेड-परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा वेग मंदावला

खेड-परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा वेग मंदावला

sakal_logo
By

फोटो ओळी
rat२९p४२.jpg, rat२९p४३.jpg- KOP२२L७१९३२ किंवा KOP२२L७१९३१ चिपळूण ः परशुराम घाटात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम.


परशुराम घाटात चौपदरीकरणाचा वेग मंदावला
अनेक अडथळे ; पावसाळ्यापूर्वीची डेडलाईन हुकणार
खेड, ता. २९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मे महिना अखेर घाटातील एक मार्गिका तरी सुरू करण्याच्या निर्धार महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीने केला आहे; मात्र आतापर्यंत जे काम झाले आहे ते पाहता ठेकेदाराने कितीही ताकद लावली तरीही मे २०२३ अखेर घाटाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत चार अवघड घाट येतात. यामध्ये कशेडी, भोस्ते, परशुराम आणि कामथे या घाटांचा समावेश आहे. महामार्गावरील या अवघड घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान, रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्ग बांधला जात असून त्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कशेडी घाटाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
खेड तालुक्यातील भोस्ते आणि चिपळूण तालुक्यातील कामथे या दोन्ही अवघड घाटांच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कशेडी, भोस्ते आणि कामथे या तिन्ही घाटातील अपघातांचा धोका कमी झाला आहे; मात्र परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम वेळेत सुरू न झाल्याने या घाटाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून अपघातांचा धोका कायम आहे.
२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत परशुराम घाटाचा दरीकडचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवावी लागली होती. या दरम्यान महामार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी चिरणी-आंबडसमार्गे चिपळूण या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात येत होता. पावसाळा संपल्यावर ठेकेदाराने पुन्हा जोरदार कामाला सुरवात केली. यासाठी काही महिने परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा चिरणी-आंबडसमार्गे वळवण्यात आली. सुमारे दोन महिने परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवून युद्धपातळीवर चौपदरीकरणाचे काम सुरू ठेवण्यात आले होते; मात्र तरीही परशुराम घाटातील एक मार्गिकादेखील सुरू करणे शक्य झाले नाही. घाटातील काम करताना वाहतुकीमुळे होणारा अडथळा लक्षात घेत पुन्हा काही महिने घाट बंद ठेवून दिवसरात्र काम करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला होता; मात्र या निर्णयाला स्थानिक जनता आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, चालकांनी कडाडून विरोध केल्याने हा निर्णय प्रशासनाला रद्द करावा लागला होता.

काम करताना अडथळे
सद्यःस्थितीत घाटातून वाहतूक सुरू असतानाही चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र घाटाची रचना, घाटाच्या दोन्ही बाजूला वसलेली गावे यामुळे ठेकेदार कंपनीला काम करताना अनेक अडथळे येत आहेत. परिणामी ठरविक मुदतीत घाटाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.