
मुख्यालयात प्रकल्प होऊनही निराशाच
swt2930.jpg
71979
सिंधुदुर्गनगरीः टाउन पार्कची झालेली दुरावस्था.
swt2929.jpg
71978
सिंधुदुर्गनगरीः एसटी आगार रस्त्याची झालेली दुरावस्था.
मुख्यालयात प्रकल्प होऊनही निराशाच
डागडुजीचा अभावः स्थानिकांना फायदा कधी होणार?
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ः जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून विकसित झालेल्या सिंधुदुर्गनगरीत अनेक विकास प्रकल्प झाले तरीही येथील जनतेच्या पदरी निराशात पडली आहे. सर्व विकास प्रकल्पांची डागडूजी अभावी बिकट स्थिती पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गनगरीत झालेले विकास प्रकल्प कोणाच्या भल्यासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गची राजधानी म्हणून जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरीची निर्मिती झाली. या निर्मितीनंतर गेल्या अनेक वर्षात येथे विविध विकास प्रकल्प झाले. येथील जनतेला सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात, विरंगुळा व्हावा, छोटे-मोठे रोजगार निर्माण व्हावेत, यासाठी कोट्यावधी रुपये निधी खर्च करून नवनगर प्राधिकरण क्षेत्रात टाउन पार्क, स्मृति उद्यान, जैवविविधता पार्क, दाबाचीवाडी पर्यटन केंद्र, एसटी आगार असे विविध प्रकल्प निर्माण करण्यात आले. याव्यतिरिक्त येथील रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीची फुलझाडे लावण्यात आली.
विविध ठिकाणी सर्कल निर्माण करून त्याचे शुशोभिकरण, कारंजे, विविध पुतळे बसविण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग (फूटपाथ) बनविण्यात आले. अशा विविध विकास कामांवर आतापर्यंत जिल्हा प्राधिकरणमार्फत शासनाचा कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. परंतु, सद्यस्थितीत या सर्व विकास प्रकल्पांची डागडूजी अभावी बिकट स्थिती पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गनगरीत अनेक विकास प्रकल्प होऊनही जनतेच्या पदरी निराशाच दिसत आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालयाचा विकास कोट्यावधी रुपये निधी खर्च करूनही गेल्या २५ वर्षानंतरही जैसे थे राहिला आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयात झालेले विकास प्रकल्प कोणाच्या फायद्यासाठी? असा प्रश्न निर्माण होत आहे. या कोट्यावधीच्या प्रकल्पांमुळे आतापर्यंत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांचेच भले झाले. जनता मात्र अद्यापही विकासापासून आणि सोयी सुविधांपासून वंचितच राहिली आहे.
अशा आहेत समस्याः
* सिंधुदुर्गनगरीत भरणारा आठवडा बाजार अद्यापही गैरसोईचा भरत आहे. येथे अद्यापही आवश्यक सुविधा नाहीत. अनेक समस्या भेडसावत आहेत. येथे महिला व्यापारी ग्राहकांची गैरसोय, स्वच्छता शौचालयाचा गंभीर प्रश्न आहे. व्यापाऱ्यांना छप्पर नाही, बसायला स्वच्छ जागा नाही, बांधलेल्या इमारतींचे गाळे वापरावींना पडले आहेत. प्राधिकरणकडून भरमसाठ कर आकारला जातो तर येथील व्यापाऱ्यांना अद्यापही व्यापारी संकुलाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
* दाबाचीवाडी तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करून पर्यटन केंद्र बनविण्यात आले. यासाठी साडेचार कोटी रूपये निधी खर्च करण्यात आला. येथे प्रशस्त असे गार्डन, बोटिंग सुविधा, मुलांसाठी खेळाचे साहित्य ,बैठक व्यवस्था, जेठी, उपहार गृह, शौचालय अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी पर्यटकांना जाणेही कठीण बनले आहे. येथे जाणारा रस्ता आणि पर्यटन स्थळाची देखभाली अभावी दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे.
* सिंधुदुर्गनगरीत प्रशस्त असे टाउन पार्क निर्माण झाले. मात्र, तेथे स्वच्छता व देखभालीचा अभाव असल्याने हे टाऊन पार्क सुद्धा वापराविना दुर्लक्षितच पडले आहे. सिंधुदुर्गनगरी मुख्यालयाची वाहतूक व्यवस्था सुधारावी, येथील नागरिकांना वाहतुकीची सोय निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा मुख्यालयात पाच वर्षांपूर्वी एसटी आगाराची निर्मिती करण्यात आली. मात्र, अद्यापही त्या ठिकाणी पावसाळ्यात चिखल व पावसाचा त्रास तर उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अद्यापही तेथे आवश्यक सोयी सुविधा झालेल्या दिसत नाहीत.
* येथील रस्त्याच्या शुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करून रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीची फुलझाडे लावण्यात आली. मात्र, ती सद्यस्थितीत झाडाझुडपात आणि वेलींच्या विळख्यात सापडली आहेत. अशाप्रकारे सिंधुदुर्गनगरीच्या विकासात भर घालणारे अनेक प्रकल्प होऊनही येथील जनतेला कोणताही लाभ झालेला नाही.
-------------------
कोट
सिंधुदुर्गनगरीतील विकास प्रकल्पांच्या डागडुजी व शुशोभीकरणासाठी शासनाने 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 8 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातून काही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. अद्यापही 17 कोटी निधीची प्रतीक्षा आहे. या निधीतून टाऊन पार्क, दाबाचीवाडी पर्यटन स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण यांसह विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- शंकर बर्गे, अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
------------------
कोट
जिल्हा मुख्यालयाचा विकास गेली अनेक वर्षे जिल्हा प्राधिकरणच्या माध्यमातून धिम्यागतीने सुरू आहे .संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक तेवढे याकडे लक्ष दिले जात नाही. निधी असूनही प्रकल्पांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे ओरोस नगरपंचायत अस्तित्वात येणे आवश्यक आहे. तरच जिल्हा मुख्यालयाचा विकास झपाट्याने होऊ शकतो.
- सुशील निबरे, सामाजिक कार्यकर्ते, ओरोस
------------------
कोट
सिंधुदुर्गनगरीत अनेक प्रकल्प झाले. त्यावर कोट्यावधी रुपये निधी खर्चही झाला. मात्र, यातून जनतेचा विकास आणि समस्या संपलेल्या नाहीत. येथील जनता विकासापासून अद्यापही दूरच राहिली आहे. मात्र, या कोट्यावधीच्या प्रकल्पातून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा आर्थिक विकास झाल्याचे दिसून येत आहे.
- प्रसाद गावडे, माजी तालुकाध्यक्ष, मनसे
-------------