
आचारसंहितेमुळे विकासकामांवर परिणाम
आचारसंहितेमुळे विकासकामांवर परिणाम
कणकवली,ता. ३० ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा आचारसंहिता सुरू झाली आहे. गेल्या महिण्यापासून सलग आचारसंहिता राहिल्यामुळे ग्रामविकासावर दूरगामी परिणाम होणार आहे. ऐन आर्थिक वर्ष संपण्याच्या तोंडावर आचारसंहिता असल्याने विकास तरी कसा होणार? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
सरपंच नुकतेच विराजमान झाले आहेत. काही ठिकाणी उपसरपंचांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. कोकण विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रीया ५ जानेवारी पासून सुरू होत असल्याने येथे आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आजपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. ग्रामपंचायत संपल्या असताना आता शिक्षक मतदारसंघाची आचारसहिता पूर्ण कोकणभर लागू झाल्याने विकास प्रक्रिया मात्रक ठरणार आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अद्याप तयार नाहीत. पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्याला ग्रामसभेच्या मान्यताही मिळालेल्या नाहीत. जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या ग्रामपंचायतींच्या प्रक्रिया तर संपूर्ण अपूर्णच आहेत. नवनिर्वाचित सरपंच आणि कार्यकारणीला पुढील आर्थिक वर्षाच्या तरतुदीसाठी विकास आराखडा तयार करायचा आहे. याचबरोबर जिल्ह्यात बहुतांशी गावांमध्ये केंद्राच्या जलजीवन विकास यंत्रणे अंतर्गत नळ योजना मंजूर झाल्या आहेत. या नव्या योजनांच्या पाच ते दहा टक्के वर्गणी भरणा करण्यासाठीचा निर्णय ही ग्रामसभांना घ्यावयाचा आहे. परंतु, सलग आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही विकास ठरावाला मंजुरी घेता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांच्या मासिक सभा ही पुढच्या काही कालावधीसाठी होणार आहे; पण त्या आचारसंहतीचे कचाट्यात आहेत. यामुळे विकासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.