Disaster Management : नैसर्गिक आपत्तीचे धडे घेतायतं 300 आपदामित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disaster Management
नैसर्गिक आपत्तीचे धडे घेतायतं 300 आपदामित्र

Disaster Management : नैसर्गिक आपत्तीचे धडे घेतायतं 300 आपदामित्र

रत्नागिरी : चिपळूणमध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी बांधून जिल्हा प्रशासनाने भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची मोठी तयारी केली आहे. मनुष्यबळाऐवजी मदतकार्यात अडथळा येऊ नये, वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपदामित्रांची फळी तयार केली आहे.

३०० आपदामित्रांना परिपूर्ण प्रशिक्षण देण्याचे काम नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आपती प्राधिकरण, मुंबईतील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी संयुक्तरित्या हाती घेतले आहे.

आपत्तीच्या काळात मानवी व वित्तहानी होऊ नये, लवकर स्थिती पूर्वपदावर कशी आणता येईल याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने प्रशासन, शासनाला अनेक धडे मिळाले. मनुष्यबळाचा अभाव आणि कोणतेही प्रशिक्षण नसल्याने या नैसर्गित आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली.

ही टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकाऱी एम. देवेंदर सिंह आणि अप्पर जिल्हाधिरी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ३०० आपदामित्रांची फळी उभी करण्याचा निर्णय घेतला.

त्याला जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी अजय सूर्यवंशी यांची जोड मिळालाने आपदामित्रांची एक मजबूत फळी उभी राहात आहे. त्यासाठी गेले काही दिवस नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील ३०० आपदांना परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण, मुंबईच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी संयुक्तरित्या हाती घेतले आहे. या प्रशिक्षणाचा आरंभ जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच पोलिस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला.


जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील इच्छुकांना हे ८ दिवसांचे प्रशिक्षण ५० जणांच्या ६ गटांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. त्यांना सुरक्षेसाठी आवश्यक कीट, ५ लाखाचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ही टीम आपत्तीवेळी आपापल्या भागात मदतकार्य करणार आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

  • कोणत्याही आपत्तीकाळात आपदामित्र उपयुक्त ठरणार
    आपत्ती प्रशिक्षण घेतलेल्यांना ५ लाखाचे विमा संरक्षण
    आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीकाळास आपत्तीनंतरच्या


  • उपाययोजना आणि मदतकार्याविषयीचे प्रशिक्षण,
    प्रशिक्षणार्थींना लाईफजॅकेट, बॅटरी, दोरखंड व आवश्यक सुविधा मिळणार

मुलींचाही आपदामित्र म्हणून होणार समावेश
आपती व्यवस्थापन व नियंत्रण या गोष्टी महत्वाच्या आहेत. जिल्हा आपत्तीप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात संभाव्य आपती वाढताना दिसत आहेत. येणाऱ्या आपत्तीकाळात त्या अनुषंगाने प्रशिक्षित देण्यात येणारे आपदामित्र प्रशासनासोबत मदतकार्यात काम करतील.

लवकरच या उपक्रमात आपदामित्र म्हणून मुलीचादेखील समावेश करण्यात येणार आहे. येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बॅच सुरू होईल.
- अजय सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी, रत्नागिरी.