विकासात हयगय तर गय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासात हयगय तर गय नाही
विकासात हयगय तर गय नाही

विकासात हयगय तर गय नाही

sakal_logo
By

72170
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली. शेजारी महेश सारंग, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


विकासात हयगय तर गय नाही

राजन तेलींचा अधिकाऱ्यांना इशारा; सुरुवात सावंतवाडीतून, याआधी ग्रामसडक योजनेत दिरंगाई, भ्रष्टाचार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः विकासाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेण्यात येणार आहे. याची सुरुवात सावंतवाडीतून झाली आहे, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला. मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात झालेली दिरंगाई व भ्रष्टाचाराबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.
श्री. तेली यांनी आज येथे भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नवीन संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून झालेले रस्ते आपणच केल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी अलीकडेच केला होता; परंतु हे रस्ते भाजपच्या माध्यमातून झाले आहेत. खासदार राऊत ज्याप्रमाणे जनतेमध्ये जो आभास निर्माण करत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. यापुढे जिल्ह्यातील रस्त्यांचा विकास लक्षात घेता येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पावसाळ्यात खराब होणारे रस्ते नव्याने करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येणाऱ्या बजेटमध्ये ही रक्कम देण्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. याचबरोबर शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली दुरावस्था, तेथील अपुऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था व इतर आवश्यक गोष्टी अधिवेशनानंतर बैठक लावून सोडवण्याची मागणीही मी केली आहे. येत्या जानेवारीनंतर यासाठी त्यांनी जिल्ह्यात येण्याची ग्वाहीही दिली आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई व भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात जनतेच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे या कामाची सकोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई होण्याची मागणी मी मंत्री महाजन यांच्याकडे करणार आहे. विकासाच्या बाबतीत जिल्ह्यातील अधिकारी व ठेकेदार आमची वल्गना करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, हे सावंतवाडीतून दिसले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसाठी काम करण्याची सोडावे. सरपंचपदापेक्षा उपसरपंच निवडीमध्ये भाजपाला झुकते माप मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी भाजपाचे उपसरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंच व उपसरपंचांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ५९ कोटीची मागणी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय पर्यटनाच्या माध्यमातून येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी केली आहे.’’
------------
चौकट
सोनुर्लीचा विकास करू
जिल्ह्याचा पर्यटनाच्या बाबतीत विकास केला जाणार आहे. यामध्ये आंगणेवाडी, कुणकेश्वरच्या धर्तीवर सोनुर्ली श्री देवी माऊली मंदिराचा विकास केला जाणार आहे. तेथील गावात विकासात्मक गोष्टी राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी तेथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे. लवकरच सोनुर्लीचा कायापालट झालेला दिसेल, असे श्री. तेली यांनी सांगितले.
------------
चौकट
तालुक्यात ४० प्लस गाठू
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंबर एकचा पक्ष भाजप राहिला आहे. जवळपास ३२ ग्रामपंचायतीत भाजपने झेंडा फडकवला आहे. लवकरच हा आकडा ४० प्लस होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे, असेही श्री. तेली यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.