राऊतांच्या पाठपुराव्यानेच रस्ते मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतांच्या पाठपुराव्यानेच रस्ते मंजूर
राऊतांच्या पाठपुराव्यानेच रस्ते मंजूर

राऊतांच्या पाठपुराव्यानेच रस्ते मंजूर

sakal_logo
By

swt319.jpg
72230
कुडाळः पत्रकात परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख संजय पडते. सोबत अतुल बंगे, राजू गवंडे.

राऊतांच्या पाठपुराव्यानेच रस्ते मंजूर
संजय पडते ः ''प्रधानमंत्री ग्रामसडक''मधून दीडशे कि.मी.ची कामे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. 31 ः खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीडशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. याचे सर्व श्रेय खासदार राऊतांनाच जाते. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयत्या जेवणावर ताव मारण्याचा प्रयत्न करू नये, अशी जोरदार टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली.
येथील शिवसेना शाखेत आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख पडते बोलत होते. यावेळी अतुल बंगे, राजू गवंडे, बाबी गुरव, बंड्या कोरगावकर, गोट्या चव्हाण आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
पडते म्हणाले, "गेली आठ वर्षे खासदार राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आताच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. यात सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील दीडशे किमी लांबीच्या 37 रस्ताकामांचा समावेश आहे. या रस्त्यांची अंतिम मंजुरी केंद्राकडे दीर्घकाळ प्रलंबित होती. खासदार राऊत यांनी 15 ला खासदार सुनील तटकरे व खासदार बाळू धानोरकर यांच्या समवेत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची भेट घेऊन मंजुरीसाठी विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा 21 ला खासदार राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना घेऊन संबंधित मंत्री व सचिव यांच्या स्तरावर बैठक घेऊन त्यामध्ये त्यांच्यासह सर्व खासदारांनी आक्रमक भूमिका मांडल्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील खासदारांनी सूचविलेल्या रस्त्यांना निधीची तरतूद करून कामे मंजूर करण्यात आली. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोणताही संबंध नसून याचे श्रेय भाजपा आणि जिल्हाध्यक्ष तेलींनी घेऊ नये. पंतप्रधान ग्रामसडक योजना देशभर राबविण्यात येते. त्यामुळे ती कोणत्याही पक्षाची योजना नाही. या योजनेंतर्गत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या यांच्या माध्यमातून या जिल्ह्यात अनेक कामे झाली आहेत. यापुढेही खासदार राऊतांच्या माध्यमातून होणार आहेत. तेली यांची ''खोटे बोला पण रेटून बोला'' अशी पद्धत असून केंद्रात राणे ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी जिल्ह्यात एकतरी विकासकाम मंजूर करून आणल्याचे तेलींनी दाखवून द्यावे."
पडते पुढे म्हणाले, "सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मंजूर केले; मात्र या महाविद्यालयाचे काम कोणी व का थांबवले? जिल्ह्यातील विकासकामे थांबविण्यामागे कोण आहे? याचे आत्मपरीक्षण तेलींनी करावे. आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत झालेल्या वॉटर प्युरिफायर घोटाळ्याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठविला आहे. या वॉटर प्युरिफायर खरेदीवेळी कोणाच्या पक्षाची जिल्हा परिषदेत सत्ता होती? अध्यक्ष कोण होते? कोणाच्या दबावाखाली ज्यादा किंमतीने खरेदी झाली? याचेही आत्मपरीक्षण तेली आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी करावे."
..................