सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’
सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’

सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’

sakal_logo
By

72323
72325
मालवण ः येथील किनाऱ्यावर पर्यटकांची झालेली गर्दी. (छायाचित्र ः नारायण धुरी)


सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’

हॉटेल्स आरक्षित; मालवणसह वेंगुर्लेतील किनारे गजबजले, यंदाचा नववर्ष हंगाम जोरात


निखिल माळकर : सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच १ जानेवारी २०२३ ला अभिनेते, उद्योजक, राजकीय नेते अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटकांची सिंधुदुर्गात गर्दी वाढली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’ झाला आहे. शेजारील महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने जिल्ह्यात दाखल झाली आहेत व होत आहेत. येथील सर्व समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने किनाऱ्यावरील व्यावसायिकांना याचा फायदा होत आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सच्या खोल्‍या भरल्या असून आता नव्याने दाखल होणाऱ्या पर्यटकांना खोल्या मिळणे कठीण होत आहे. कोरोना महामारीनंतर पर्यटन व्यवसाय उभारी घेत आहे.
स्वच्छ व सुंदर किनारे, निसर्गरम्य ठिकाणांसह कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने मुंबई, पुण्यासह विविध मोठ्या शहरांतील लाखो पर्यटक नववर्ष स्वागतोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटन व्यवसाय तेजीत आला आहे. पर्यटन विकास महामंडाळाची निवास व्यवस्था ३ जानेवारीपर्यंत ‘फुल्ल’ असून हॉटेल व्यावसायिकही समाधानी दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांकडून नियोजन केले जाते. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी फिरायला जाण्यासह पार्ट्या आयोजित केल्या जातात. त्यात किनारी भागांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यंदा कोरोनाचे सावट या उत्साहावर राहणार आहे. गेल्या आठ दिवसांत लाखो पर्यटकांनी वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आदी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी हजेरी लावली होती. सर्वाधिक गर्दीची नोंद २४ ते २६ डिसेंबरला झाली. त्यानंतर हळूहळू जोर ओसरला; परंतु ३१ डिसेंबरला त्यात वाढ झाली आहे.
त्यामुळे नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीय पर्यटक कोकणात दाखल होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरही प्रचंड गर्दी असून गोव्यात गर्दी झाल्यामुळे पर्यटकांनी आपली पावले सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांकडे वळविली आहेत. पर्यटकांचा राबता वाढला तर त्याचा फायदा पर्यटन व्यावसायिकांना होणार आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या रात्री गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकारासह गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. किनारी भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी होण्याची शक्यता असलेल्या जागा लक्षात घेऊन तिथे बॅरिगेडस् लावली आहेत.
कोकणचे निसर्गसौंदर्य पाहण्याबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कोकणची किनारपट्टी पर्यटकांनी बहरून गेली आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने परदेशी पर्यटक, मित्र परिवार तसेच शाळा, महाविद्यालये नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गासह गोव्यातील पर्यटन स्थळे, तेथील समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. सिंधुदुर्गातील देवगड, वेंगुर्ले व मालवण तालुक्यांतील किनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. येथील पुरातन मंदिरे, समुद्रकिनारे, बंदर परिसर, नौकानयन, किल्ले पाहण्यासाठी आठवडाभर अगोदरच पर्यटकांनी हजेरी लावली आहे. वर्षाची अखेर आनंदात जावी, नववर्षाचा मुहूर्त होत असताना एका सुवर्णमयी जागेवर असावे, नव्या वर्षाचे स्वागत करताना दगदग आणि धावपळीत संपलेल्या वर्षाला निरोप द्य़ावा, यासाठी पर्यटकांची पावले सहय़ाद्रीपासून सागरापर्यंत वळली आहेत. विजयदुर्गपासून गोवा किनारपट्टीपर्यंत सर्वत्र देशविदेशातील अनेक चेहरे दाखल झाले आहेत.
मालवण तर पर्यटकांची पंढरी असून येथील किनारे सर्वांचेच आकर्षण आहेत. शिवाय सह्याद्रीही पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवू लागला आहे.
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी मालवणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पर्यटकांच्या वाहनांनी येथील रस्ते गजबजून गेले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तारकर्ली, देवबागमध्ये तर विक्रमी गर्दी झाली आहे. देवबाग त्सुनामी बेटावर बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आदी जलक्रीडा प्रकारांसाठी दिवसभर मोठी गर्दी आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा चोख नियोजन केले आहे; मात्र अरुंद रस्ते, अपुऱ्या पार्किंग सुविधेचा पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. मालवणात १८ डिसेंबरपासून पर्यटकांनी आगाऊ बुकिंगसह गर्दी केली आहे. सलग सुट्ट्या तसेच नाताळ सणाची मजा लुटताना थर्टी फर्स्टचा आनंद पर्यटकांकडून साजरा केला जात आहे. किल्ले सिंधुदुर्ग, स्कुबा डायव्हिंग, रॉक गार्डन, चिवला बीच, तारकर्ली, देवबागसह सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. जलक्रीडा प्रकाराला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देवबागमध्ये वॉटर स्पोर्ट्स तसेच डॉल्फिन दर्शन व अन्य जलक्रीडांचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. सर्व हॉटेल फुल्ल झाल्याने पर्यटकांना रुम मिळविताना मोठी अडचण होत आहे. वाहनांना असणारी अपुरी पार्किंग सुविधा व अरुंद रस्ते ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जादा पोलिस कुमक मागवून योग्य नियोजन केले आहे. पर्यटकांची ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत कायम राहील, असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
................
पर्यटनाने कात टाकली
सुरुवातीस मुंबईकर चाकरमानी, त्यांची मित्रमंडळी, एप्रिल, मे, गणपतीचा हंगाम अशा कालावधीत इकडे उतरत असत. नंतरच्या काळात पुणेकर दिवाळी, नाताळच्या सुटीत कोकणात येऊ लागले; पण जसजसा काळ बदलू लागला, तसतसे इकडे येणारे पर्यटक बदलू लागले. आज इथे येणारा पर्यटक हा कोकणाकडे एक पर्यटनस्थळ या नजरेने पाहतो. त्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे सिंगापूर किंवा बँकॉक किंवा काश्मिर किंवा केरळ, कन्याकुमारी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग. इथल्या व्यावसायिकांनी हे होणारे स्थित्यंतर जाणून घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे आपल्या वागण्या-बोलण्यात आणि सेवेत बदल करणे आवश्यक आहे. कारण आज येणारा पर्यटक हा पैसे खर्च करण्यासाठीच येतो. आवश्यक दर्जाच्या सुविधा कितीही पैसे मोजून खरेदी करण्याची त्याची तयारी असते. ही नवीन मानसिकता इथल्या व्यावसायिकांनी आता ओळखली आहे. हळूहळू बदल होतो आहे. त्यादृष्टीने ''एमटीडीसी''नेही काही सकारात्मक पावले उचलली आहेत.
.................
कोकणलाही प्राधान्य
कोकणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गेले दोन दिवस परजिल्हयांतील पर्यटक पाहुण्यांबरोबरच परदेशातील पर्यटनप्रेमींनी सिंधुदुर्गात हजेरी लावली आहे. गोवा राज्यातील पर्यटनस्थळे, तेथील समुद्र किनाऱ्यांना भेटी देतानाच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे पाहुणे विसरत नाहीत. सध्या सिंधुदुर्गातील देवगड व मालवण येथील किनाऱ्यांवर शुक्रवारपासूनच पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. देवगड येथील समुद्रकिनारी नववर्षाच्या स्वागतासाठी रंगमंच, स्टॉल, प्रकाश योजना आदींचे नियोजन केल्याचे दिसते. येथील पुरातन मंदिरे, देवगड येथील आशिया खंडातील पहिला पवनऊर्जा प्रकल्प, किनारे, बंदर परिसर, नौकानयन, किल्ले पाहण्यासाठी दोन दिवस अगोदरच पर्यटकांनी हजेरी लावली आहे. कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर या धार्मिक स्थळाला तर सध्या जत्रेचे स्वरुप आले आहे.
................
राहण्या-खाण्याच्या दरांत वाढ
या वर्षी हॉटेल व खाणावळीतील जेवणाच्या व राहण्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील महिन्यात सिंधुदुर्गात एका जोडप्यासाठी एक दिवस-रात्रीसाठी एक ते दीड हजार रुपये साध्या खोलीसाठी होते, आता १८०० ते २५०० रुपये मोजावे लागत आहेत. तर दोन ते चार हजार एसी रुमसाठी भाडे आहे. मागील महिन्यात चार व्यक्तींना राहण्याचा एक दिवस-रात्रीसाठी साधारण खोलीकरिता एक ते दीड हजार रुपये असलेला दर १८०० ते २००० रुपये झाला आहे. तर एसी व टीव्ही असलेल्या खोलीसाठी चार हजार रुपयांपर्यंत आहे. विविध ऑफरही दिल्या जात आहेत.
.............
कोट
सिंधुदुर्गात या हंगामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सावंतवाडीमध्येही पर्यटकांचा ओघ दिसत आहे. शाकाहारी जेवणाला पसंती देणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर निर्माण झालेली ही चांगली स्थिती म्हणता येईल. नवे वर्ष पर्यटन आणि पर्यटन व्यावसायिकांच्या दृष्टीने सकारात्मक असेल, असे संकेत एकूणच पर्यटकांच्या प्रतिसादावरून मिळत आहेत.
- गुरुदास देवस्थळी, साधले मेस, सावंतवाडी.