उद्यमशीलतेचे धडे देणारी शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यमशीलतेचे धडे देणारी शाळा
उद्यमशीलतेचे धडे देणारी शाळा

उद्यमशीलतेचे धडे देणारी शाळा

sakal_logo
By

7228१
नेरूर-माड्याचीवाडी ः विद्यार्थ्यांनी लागवड केलेली वाल बहरली आहे.
7228२
ओळ - भोपळा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन त्याची विक्रीदेखील केली.
72283
ओळ - विद्यार्थ्यांनी तयार केलेली शेतीउपयुक्त अवजारे

उद्यमशीलतेचे धडे देणारी शाळा
पाट, नेरूरमध्ये कृषी संस्कारांची पेरणी

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता.३१ ः शाळेच्या चाकोरी पलीकडे जाऊन कुडाळ येथील एस. के. पाटील शिक्षण संस्था गेल्या सहा वर्षांपासून नेरूर-माड्याचीवाडी आणि एस. एल. देसाई पाट या विद्यालयांमध्ये कृषी आणि उद्यमशीलतेचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. कोवळ्या मनावर उद्योगशीलतेची बीजे पेरण्याचा हा संस्कारच म्हणावा लागेल.

बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशू, पाखरे, यांच्याशी गोष्टी करू!
कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘बिनभिंतीची शाळा’ यातील या ओळी खूप बोलक्या आहेत; परंतु याच ओळींप्रमाणे कुठे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते का, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्याचे उत्तर नेरुर-माड्याचीवाडी आणि एस. एल. देसाई पाट विद्यालय आहे. शासन आता कुठे कौशल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली राबविण्यावर विचार करीत आहे; परंतु या विचारावर आधारित शिक्षणप्रणाली राबविण्याचा संकल्प नव्हे तर निर्णय सहा-सात वर्षांपूर्वीच या शिक्षण संस्थेने घेतला आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. या अभिनव उपक्रमासाठी सावली ट्रस्ट (मुंबई) ने अर्थसाहाय्याची हमी दिली. भगीरथ प्रतिष्ठानसह विविध संस्थांनी सहकार्याची तयारी दर्शविल्यानंतर जगण्याच्या शिक्षणाचे धडे दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांना मिळू लागले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला आपल्याजवळ काहीतरी कौशल्य आहे, याची जाणीव निर्माण झाल्यास विद्यार्थी कधीच बेरोजगार राहणार नाही, या हेतूने संस्थेने प्रात्यक्षिकांसह कृषीशिक्षणास सुरुवात केली. मशागत, भाजीपाला लागवड कशी करावी, यासह पूरक सेंद्रिय खत, कंपोस्ट खतांची निर्मिती याचे धडे तज्ज्ञांकडून दिले जातात. शाळा परिसरात भाजीपाल्यांचे उत्पादन घेऊन विक्री केली जाते. हजारो रुपयांचा माल विद्यार्थी हातोहात विक्री करतात. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शेतीसोबत कुक्कटपालन, मधमाशीपालन, रोपवाटिकानिर्मिती आदी पूरक व्यवसायांचे प्रशिक्षणही देण्यात येते.
कृषी आणि पूरक व्यवसाय शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित इलेक्ट्रिक, वेल्डिंग, इलेक्ट्रॉनिक, गवंडीकाम, सेंट्रिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फ्रॅबिकेटर्स, स्वयंपाक, विणकाम, शिवणकाम, सेंद्रिय खतनिर्मिती अशा विविध कौशल्यविकासाचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह दिले जाते. अनुभवी प्रशिक्षक, तज्ज्ञ शेतकरी प्रशिक्षण देतात. प्रशिक्षित विद्यार्थी टिकाऊ लोखंडी शिड्या, कार्यालयीन वापरात येणारे रॅक, स्टॅन्ड बनवितात आणि त्यांची विक्री करतात. नेरूरप्रमाणे याच संस्थेच्या पाट विद्यालयामध्ये कला अकादमीसारखा अभिनव उपक्रम राबविला जातो. शिक्षणासोबत नृत्य, नाट्य, चित्रकला, रंगकाम यासह विविध कलांचे शिक्षण दिले जाते.
दोन्ही विद्यालयांमधील तरुणांनी बेरोजगारीच्या दुनियेत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत बस्तान बसविले आहे. माड्याचीवाडी विद्यालयात हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी शिक्षक दीपक सांमत, तर पाट विद्यालयात कला अकादमीची जबाबदारी शिक्षक संदीप साळसकर पार पाडतात.

दृष्टिक्षेपात
* पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार, दोडका, पडवळ, वाल, कारली, कोबी, काकडी, मका, भातपीक लागवड, झेंडू, फळझाडे लागवडीतून उत्पादन
* आठवी-नववीसाठी प्रशिक्षण, ५०० हून अधिकांनी घेतला लाभ, काहींनी सुरू केले व्यवसाय
* नृत्य, नाट्य, रंगकाम शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शहरात रोजगार

कृषी आणि किमान कौशल्यावर आधारित शिक्षण ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. रोजगारक्षम विद्यार्थी घडविणे हाच हेतू असून, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळाला. हेच प्रकल्पाचे यश आहे.
- सुधीर ठाकूर, सचिव, एस. के. पाटील शिक्षण संस्था, पाट (कुडाळ)

कौशल्य हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. कोवळ्या वयातच विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर त्यांच्यावर बेरोजगारीची वेळच येणार नाही. माड्याचीवाडी शाळेतील कौशल्य विकास उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविला गेला पाहिजे. पेन-वहीसोबत जगण्यासाठी आवश्यक शिक्षण शाळांमधून देण्याची गरज आहे.
- डॉ. प्रसाद देवधर, अध्यक्ष, भगीरथ प्रतिष्ठान, झाराप