जिल्ह्यातील पर्ससीननेट मासेमारीला आजपासून बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील पर्ससीननेट मासेमारीला आजपासून बंदी
जिल्ह्यातील पर्ससीननेट मासेमारीला आजपासून बंदी

जिल्ह्यातील पर्ससीननेट मासेमारीला आजपासून बंदी

sakal_logo
By

पर्ससीननेट मासेमारीला आजपासून बंदी
२८० नौकांवर लक्ष ; डोळेझाक होणार की कारवाई ?
रत्नागिरी, ता. ३१ ः शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार जिल्ह्यातील पर्ससीन नेटद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीला उद्यापासून (ता. १) बंदी आहे. जिल्ह्यात सुमारे २८० पर्ससीनधारक असून त्यांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर अशी मासेमारीची चार महिनेच परवानगी आहे. त्यामुळे पर्ससीननेट नौकामालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खलाशांच्या वेतनासह बँकेकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या हप्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याच्या सागरी जलदीमध्ये बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी होण्याची दाट शक्यता आहे. मत्स्यविभाग डोळेझाक करणार की कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
जिल्ह्याचा मत्स्य व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे; परंतु काही वर्षांपासून निसर्गाच्या गर्तेत हा व्यवसाय अडकल्याने मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात आहेत. रापणधारक, छोटे मच्छीमार, पारंपरिक मच्छीमार, ट्रॉलर्स, पर्ससीन नेटधारक यामध्ये हा व्यवसाय विभागला आहे. त्यात अत्याधुनिकता आल्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी होती. मच्छीमारांची संख्याही वाढल्याने वैयक्तीक मच्छीमारांच्या मासळी उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात २८० पर्ससीननेट नौका आहेत. पर्ससीननेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू होते. त्यांना मासेमारी करण्याची केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. केवळ चारच महिने या नौकांना मासेमारी करता येते. त्यामुळे उर्वरित महिने नौका किनाऱ्यावर नांगराला बांधून ठेवाव्या लागतात. मासेमारीचा चार महिन्यांचा कालावधी यंदाही अपेक्षेप्रमाणे मासेमारी झालेली नाही. अनेक वादळवाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती. पर्ससीननेट मासेमारीला चार महिने परवानगी देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात अडीच ते तीन महिनेच मासेमारीचा कार्यकाळ मिळतो. अपुऱ्या कालावधीमुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते आहे. कालावधी वाढवून मिळावा यासाठी अनेक प्रयत्न असून त्याला अजून यश आलेले नाही.
मच्छीमारांच्या या अडचणीमुळे बेकायदेशीर मासेमारी होण्याची दाट शक्यता आहे. १२ नॉटिकल मैल बाहेर जाऊन ही मासेमारी करायची आहे; परंतु अनेक मच्छीमार लांब जाऊन डिझेल खर्च आणि अपेक्षित मासेमारी होत नसल्याने १२ वाव आतच मासेमारी करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही बेकायदेशीर मासेमारी मत्स्यविभाग कसा थोपवणार, असा सवाल पारंपरिक मच्छीमार करत आहेत. उद्यापासून पर्ससीननेटद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला मत्स्यविभाग चाप बसवणार की डोळेझाक करणार हे पाहावे लागेल, असे पारंपरिक मच्छीमारांचे मत आहे.
--

इतर मासेमारीप्रमाणेच परवानगी द्यावी
पर्ससीननेट मासेमारीवर जिल्ह्यातील इतर व्यवसाय अवलंबून आहेत. पर्ससीननेट मासेमारी बंद झाल्यानंतर टेम्पो, रिक्षा, व्यापारी, मासे कापणाऱ्या महिला प्रक्रिया करणारे कारखाने, बर्फाचे कारखाने, किरकोळ बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणात मासेविक्री होणाऱ्या बाजारपेठा आदी व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळते. या व्यवसायावर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरीलही लाखो लोकांच्या संसाराचा गाडा यावर असल्याने इतरांप्रमाणेच संपूर्ण मासेमारी हंगामाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पर्ससीन नेटधारकांनी केली आहे.