
सिंधुदुर्गनगरीतील चोरी; पाच जण अटकेत
सिंधुदुर्गनगरीतील चोरी; पाच जण अटकेत
संशयित स्थानिक सदन घरातील; २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
ओरोस, ता. ३१ ः सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे व कुडाळ पोलिस ठाणे हद्दीत चोरी केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी एकूण पाच संशयितांना अटक केली आहे. या युवकांनी एकूण पाच चोऱ्या केल्याचे उघड झाले असून गॅस कटर आणि एक्सो ब्लेडचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. हे सर्व युवक सिंधुदुर्गनगरी परिसरातील स्थानिक असून यातील काही सदन घरातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून एकूण दोन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना २ जानेवारी २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
धीरज बाळकृष्ण चव्हाण (वय २९, रा. ओरोस बुद्रुक), सर्वेश महेंद्र राणे (वय २१, रा.ओरोस बुद्रुक), रोहन रमाकांत परब (वय २५, रा. ओरोस बुद्रुक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका चोरीच्या गुन्ह्यात सदानंद उर्फ विजय मधुकर गोसावी (वय ३०, रा. आदर्श नगर, ओरोस बुद्रुक), प्रशांत संजय सुर्वे (वय २४, रा. रानबांबुळी पालकरवाडी) या दोघांना अटक केली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या शासकीय मालकीच्या जैवविविधता वन उद्यानाची कुंपणाची तार, झोपडीचे पत्रे व अँगल चोरून नेल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांत गुन्हा दाखल होता. ही चोरी २६ डिसेंबर सायंकाळी साडेपाच ते २७ डिसेंबर सकाळी आठच्या दरम्यान झाली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. जैवविविधता वन उद्यानाच्या सभोवती तारेचे कुंपण आहे. कर्मचाऱ्यांना विसावा घेण्यासाठी पत्रे असलेली झोपडी आहे. अज्ञात चोरट्याने कुंपणाची २० मीटर तार चोरली होती. झोपडीचे पत्रे चोरून नेले होते. लोखंडी अँगल गॅस कटरने कापून पळविले होते. याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घेत पोलिस अधिकारी हेमंत देवरे यांना तपासाचे आदेश दिले होते. या तपासा दरम्यान सिंधुदुर्गनगरी परिसरातील काही स्थानिक युवकांवर पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी २९ ला रात्री काही तरुणांना ताब्यात घेत खाकीचा हिसका दाखविला. त्यानंतर या युवकांनी सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील एकूण पाच चोऱ्या केल्याचे मान्य केले. चार महिन्यांत या चोऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, संशयितांवर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे हद्दीत एकूण चार चोऱ्या केल्याचा तसेच कुडाळ ठाणे हद्दीतील आंब्रड आणि पोखरण या गावात चोरी केल्याचा संशय आहे.
--
पांग्रडमधील चोरीची कबुली
अनेक चोऱ्यांत सहभाग असल्याच्या कारणाने पोलिस कोठडीत असलेल्या सिंधुदुर्गनगरी परिसरातील पाच तरुणांनी आज पांग्रड येथील चोरीत सहभाग असल्याचे कबूल केले. यापूर्वी उघड झालेल्या एका चोरीतील ४८ हजार रुपये, तर एका चोरीतील पाच हजार रुपये असे एकूण ५३ हजार रुपयांची वसुली केली आहे.