टुडे पान एक अँकर-देवगडात पर्यटन हंगाम जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक अँकर-देवगडात पर्यटन हंगाम जोरात
टुडे पान एक अँकर-देवगडात पर्यटन हंगाम जोरात

टुडे पान एक अँकर-देवगडात पर्यटन हंगाम जोरात

sakal_logo
By

21000
देवगड ः येथील समुद्रकिनारी दाखल झालेले पर्यटक. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


देवगडमध्ये पर्यटन हंगाम जोरात

उन्हाळी सुटी; कुणकेश्वरसह विजयदुर्गला पसंती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः एकीकडे हापूस आंबा हंगाम आणि दुसरीकडे पर्यटनस्थळांकडे असलेला पर्यटकांचा वाढता ओढा यामुळे तालुक्यात पर्यटन हंगाम बहरत आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. स्थानिक हॉटेलमध्ये वेळेआधीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर, किल्ले विजयदुर्ग येथे पर्यटकांची वाढती गर्दी दिसत असून, उन्हाळी पर्यटनाची चाहुल लागली आहे.
कोकणातील हापूसचे पर्यटकांना मोठे आकर्षण असते. त्याचबरोबरच येथील ताज्या मासळीची लज्जत चाखण्यासाठी पर्यटक आतुर असतात. आता शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोकण किनारपट्टीचा रस्ता धरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणची पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. येणारे पर्यटक खासगी वाहने घेऊन येत असल्याने रस्त्यावरील वर्दळीत मोठी वाढ झाली आहे. देवगड-जामसंडे शहराबरोबरच तालुक्यातील तळेबाजार, शिरगाव येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिर परिसर तसेच समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. किल्ले विजयदुर्ग भागातही पर्यटकांची मोठी धावपळ दिसते. येणारे पर्यटक हापूस आंबा खरेदी करीत असल्याने स्थानिक हापूस आंबा विक्रीच्या उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी आपापल्या बागांमध्येही पर्यटकांना आंबे उपलब्ध करून देत असल्याचे दिसते. तसेच मुख्य मार्गावर आंबा विक्रीचे स्टॉल लावल्याने पर्यटकांच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे. येथील हॉटेल पर्यटकांनी गजबजलेली असतात. मागील आठवड्यात सलग आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांनी पर्यटनाचे बेत आखल्याचे दिसत होते. आता पुन्हा याच आठवड्यात सलग तीन दिवस सुटी असल्याने पर्यटन हंगाम बहरण्याची लक्षणे आहेत. येणारे पर्यटक मासळी मिळणाऱ्या हॉटेलमध्ये वेळेआधीच गर्दी करतात. आपल्याला पसंतीची मासळी न मिळाल्यास, वेळीच जागा न मिळाल्यास गैरसोय टाळण्यासाठी पर्यटकांची वेळेआधीच धांदल असल्याचे चित्र आहे. पर्यटकांमुळे स्थानिक आर्थिक उलाढालीत वाढ झाली आहे. निवास-न्याहारी तसेच लॉज आरक्षित असल्याचे चित्र आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे पर्यटकांनी गजबजलेली आहेत.
---
चौकट
गडकिल्ले, मंदिरांनाही पसंती
पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेले प्रकल्पही तेजीत आहेत. यामध्ये वॉटर स्पोर्टस्, बोटींग यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे. आता आंबा हंगामही तेजीत आहे. याच जोडीने पर्यटन हंगामही जोरास आला आहे. गडकिल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे. एकूणच तालुक्यातील पर्यटन हंगाम बहरास येत असल्याचे दिसते.
..................
चौकट
कोरोनाचे भय गायब
मागील दोन वर्षे पर्यटन हंगामावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे पर्यटक मुक्तपणे फिरताना दिसत नव्हते. तसेच पर्यटन व्यवसायालाही मर्यादा आल्या होत्या; मात्र यंदा कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे. त्यामुळे पर्यटकही पर्यटनाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57074 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top