
टुडे पान एक मेन-शुकनदी काठची ऊसशेती धोक्यात
21050
वैभववाडी ः येथे शुकनदीच्या पाणीपातळीत झालेली मोठी घट.
शुकनदी आटल्याने ऊसशेती धोक्यात
वैभववाडीची स्थिती; पाऊस लांबल्यास संकट आणखी गडद
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे येथील शुकनदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पाऊस लांबल्यास या नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची येण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील कित्येक गावातून शुकनदी वाहते. यामध्ये शिराळे, सडुरे, अरूळे, निमअरूळे, सांगुळवाडी, वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसुर, उंबर्डे, नापणे, दिगशी, तिथवली या तेरा गावांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यातील चिंचवली, खारेपाटण या दोन गावांचा समावेश आहे. पुर्वी या नदीच्या पाण्यावर या गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबुन होते. गेल्या वर्षीपासून अरूणा धरणाचे पाणी नदी अरूणा नदीत सोडले जात असल्यामुळे तिथवली आणि चिंचवली, खारेपाटण या गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत आहे; परंतु उर्वरित गावे अजुनही शुकनदीच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. या नदीच्या पाण्यावर या गावांमधील शेकडो एकर ऊसशेती अवलंबुन आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग चार पाच दिवस झालेल्या पुर्वमोसमी पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे यावर्षी नदीची पाणीपातळी चांगली राहील अशी अपेक्षा होती; परंतु वाढलेल्या तापमानामुळे गेल्या चार पाच दिवसांत शुकनदीच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याची दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नदी पात्र पुर्णतः कोरडे पडताना दिसत आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या लोकांची धाकधुक वाढली आहे.
वैभववाडीतील सार्वजनिक विहीरीनजीक शुकनदीला शांती नदी मिळते. त्यामुळे तेथुन पुढे अजुनही बऱ्यापैकी पाण्याचा प्रवाह आहे; मात्र नदीच्या वरच्या भागातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील काहीशी अस्वस्थता वाढली आहे. सद्यस्थितीत जरी पाणी कमी पडणार नसले तरी जर पाऊस लांबला तर मात्र ऊसशेतीला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच चिंतेचे वातावरण आहे.
------------
चौकट
तोडणी लांबल्यामुळे झळ कमी
यावर्षी ऊसतोडणी विलंबाने झाली. त्यामुळे नव्याने ऊस लागवड शेतकऱ्यांनी केलेली नाही. तोडणी केलेल्या ऊसासाठी देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केलेला नाही. त्यामुळे अजुनही काही भागात पाण्याची पातळी काही अंशी स्थिर दिसून येत आहे; मात्र आता ऊसतोडणी पुर्ण झाली असून शेतकरी ऊसाला पाणी देण्याची शक्यता आहे. ऊसशेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागतो. पाऊस लांबला तर मात्र ऊसशेतीला झळ बसेल अशी स्थिती आहे.
------------
कोट
ऊसतोडणी विलंबाने झाल्यामुळे यंदा पाण्याचा म्हणावा तेवढा उपसा झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी नव्याने लागवड केलेली नाही. तोडणी विलंबाने झाल्यामुळे उसाला पाणी दिलेले नाही. त्यामुळे शुकनदीच्या नापणे येथील पात्रात पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत बरा आहे. पाऊस लांबला तर मात्र टंचाई भासेल.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57105 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..