
पान दोन मेन-सिंधुदुर्गात ख़तपुरवठा पूर्ववत होणार
सिंधुदुर्गात खतपुरवठा पूर्ववत होणार
शेतकऱ्यांना दिलासा ः जिल्हा बॅंक पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून झुआरी केमिकल्सकडून खताच्या अनियमित पुरवठ्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी झुआरी केमिकलचे कार्यकारी संचालक नितीन कंटक व जनसंपर्क अधिकारी आनंद राजाध्यक्ष यांना आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेत सकारात्मक चर्चा घडवून आणली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खतपुरवठा पूर्ववत होणार आहे.
सिंधुदुर्ग बँकेच्या शिष्टमंडळात मालवण संघाचे अध्यक्ष आबा हडकर, कणकवली संघाचे चेअरमन व बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, कुडाळ संघाचे संचालक नीलेश तेंडुलकर, सावंतवाडी संघाचे बाबल ठाकूर, मालवण संघाचे गॅस विभाग प्रमुख श्री. चेऊलकर आदी उपस्थित होते.
गोवा येथील बैठकीची तत्काळ दखल घेत गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पश्चिम महाराष्ट्र या विभागाचे रिजनल मॅनेजर नागेश पाटील यांनी श्री. दळवी व श्री. काळसेकर यांच्याशी संपर्क साधून झुआरी केमिकलकडून १००० टन युरिया त्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघांना पाठविण्यात येत असून, १२:३२:१६ हे मिश्र खतसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. दुर्गम भागातील विकास संस्थांना तातडीने खते पोहोच केली जातील. खताचा पुरवठा जिल्ह्यात ६ जूनपूर्वी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. ‘झुआरी’चे अधिकारी दिगंबर तेंडुलकर हे आजच बँकेत येऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांची भेट घेणार आहेत. मिश्र खतांसाठी घेतलेल्या पॅरॅदीप फॉस्पेट कंपनीची कागदपत्रे येत्या चार दिवसांत पूर्ण करून घेणार आहेत. यामुळे वेंगुर्ले, मालवण, देवगड किनारपट्टीसह जिल्ह्यातील इतरही भागातील आंबा उत्पादकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपआपल्या भागातील विकास संस्थांमार्फत तालुका खरेदी-विक्री संघात खताची मागणी नोंदवून ते घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, उपाध्यक्ष काळसेकर व सर्व संचालकांनी केले आहे. तसेच येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझरच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शाल, श्रीफळ व आंबे देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सत्कार केला. तसेच, त्यांना सिंधुदुर्ग बँकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री सावंत यांनी भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच ते येथील सिंधुदुर्ग बँकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत.
.....................
चौकट
प्राधान्याने खते देऊ : मुख्यमंत्री सावंतांची ग्वाही
अध्यक्ष दळवी व उपाध्यक्ष काळसेकर यांनी याबाबत लक्ष वेधले. सिंधुदुर्गातील शेतकरी झुआरी केमिकलच्या मिश्र खताची नेहमीच शेती तसेच बागायतीसाठी वाट बघत असतात; परंतु ही खते वेळीच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच झुआरी केमिकलचे संबंधित अधिकारी खरेदी-विक्री संघांना म्हणावे तसे सहकार्य करत नसून, खताचा पुरवठा कधी होईल, याचीही माहिती धड देत नसल्याचे झुआरीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १००० मेट्रिक टन युरिया, तर २००० मेट्रिक टन मिश्र खतांची मागणी करण्यात आली. झुआरीच्या अधिकाऱ्यांनी १००० मेट्रिक टन युरिया तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मिश्र खतांसाठी लागणारा कच्चा माल उपलब्धतेनुसार देऊ, असे सांगितले. तसेच सिंधुदुर्गाच्या मिश्र खताच्या मागणीला निश्चित प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57174 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..