
कोकणसाठी बातमी
21038
कर्तुत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा
मधुरा बाचल यांचे गौरोवोद्गार ः ‘सकाळ वुमन इन्फ्ल्युएन्सर’ पुरस्कार कोल्हापूरमध्ये प्रदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी/रत्नागिरी, ता. ११ ः कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहीत केले आहे. अशा सर्वच कर्तुत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा, असे गौरोवोद्गार मधुरा बाचल यांनी काढले. कोल्हापूर येथे त्यांच्या हस्ते आज ‘सकाळ’च्या वुमन इन्फ्ल्युएन्सर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मधुरा बाचल या ‘मधुराज रेसीपी’ हे प्रसिद्ध युट्यूब चॅनेल चालवतात. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला ऋद्रम बँडच्या शुभम साळोखे आणि रोहीत सुतार यांनी गिटार आणि ड्रमच्या साथीने बहारदार गाणी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘सकाळ माध्यम समुहाने पहिल्यापासूनच बातमीदारीच्या पलिकडील आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. समाजात जे चांगले आहे ते वेचावे आणि लोकांसमोर मांडावे याच भावनेतून या पुरस्कारांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ रिलीफ फंडाची सुरुवातही सामाजिक उत्तरदायीत्वातून झाली. या फंडाच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूरसह राज्यभरात महापूर आणि दुष्काळाच्या काळात लोकांना मदत केली गेली. काश्मिरमध्ये अतिशय दुर्गम भागात शाळा सुरू करून माणूस जोडण्याचे काम ‘सकाळ’ने केले. ‘पंचगंगा वाचवूया’ या अभियानात हजारो नागरिकांना सहभागी करून नदी प्रदूषणमुक्त करण्याची लोकचळवळ ‘सकाळ’ने सुरू केली. पुणे, नागपूर, नाशिक येथे अशीच लोकचळवळ नदी वाचवण्यासाठी सुरू करणार आहोत. ‘सकाळ वुमन इन्फ्ल्युएन्सर’ पुरस्कारासाठी आपली निवड करताना काही निकष लावण्यात आले. त्यातून तुमची निवड केली गेली. यामुळे आपले कर्तुत्व सिद्ध झाले आहे. या कर्तुत्वाचा हा सन्मान आहे.’’
मधुरा बाचल म्हणाल्या, ‘‘संवेदनशिलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय असो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा. ‘सकाळ’ने नेहमीच महिलांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. मी ‘सकाळ’ची लहानपणापासूनची वाचक आहे. आज या सोहळ्यामुळे हा ऋणानुबंध आणखी वृद्धींगत झाला.’’
आपल्या ‘मधुराज रेसिपी’ या युट्युब चॅनेलबद्दल त्या म्हणाल्या,‘‘महाराष्ट्रीयन पदार्थ चविष्ठ आणि पौष्टीक आहेत. त्यामुळेच ते आवडीने खाल्ले जातात. या मराठी पदार्थांना जगभर पोहचवण्याच्या उद्देशाने हे युट्युब चॅनेल सरू केले. सुरुवातीला कॅमेऱ्याची सवय नसल्याने मनात धाकधुक होती. कालांतराने याची सवय झाली. आज मधुराज रेसिपी हे चॅनेल सर्वत्र पाहिले जाते.’’
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार म्हणाल्या,‘‘समाजात विविध क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वापुढे आसमानही ठेंगणे आहे. ‘सकाळ’ने दिलेल्या या पुरस्कारामुळे या महिलांना पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळार आहे. हा गुणगौरव सोहळा कायमस्वरुपी सर्वांच्या लक्षात राहील.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या बेहेरे यांनी केले. ‘सकाळ’च्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी आभार मानले. यावेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, स्मार्ट सोबती पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
----
चौकट
कोकण विभागातील पुरस्कारार्थी
साक्षी संतोष रावणंग (पंचायत समिती सदस्य, रत्नागिरी, निवळी), लिला मोहन घडशी (सामाजिक कार्यकर्त्या, लांजा), दिपाली दीपक पंडीत (सहाय्यक अधिकारी, उप विभागीय कार्यालय, राजापूर), ॲड. सुनैना सत्यनारायण देसाई (नोटरी, राजापूर), रेश्मा राजेंद्र जोशी (संचालिका, जागृत ग्रुप, रत्नागिरी-सिंधुदूर्ग), स्नेहल सुधीर यशवंतराव (राज्य महिला उपाध्याक्षा, पुरोगामी शिक्षक समिती, संचालक प्राथमिक शिक्षक सह.पतपेढी, रत्नागिरी), राधिका राजेश पाथरे (अध्यक्ष. चिपळूण अर्बन सह.बँक), स्वप्ना प्रशांत यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, चिपळूण नागरी सह.पतसंस्था), नेत्रा नवनीत ठाकूर (सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी), वैभवी वैभव खेडेकर (सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षिका, खेड), प्रणाली प्रकाश जंगम (कावेरी गृहोद्योग, भरणे-खेड), अनामिका राजेश्वर चव्हाण - जाधव (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी), अर्पणा प्रशांत कोठावळे (सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या, कोलगाव, सावंतवाडी)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57186 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..