
तोंडवलीत डंपर चालकांची मुजोरी
21103
नांदगाव ः येथील अपघातग्रस्त मोटार.
तोंडवलीत डंपर चालकांची मुजोरी
मोटारीला दोनवेळा धडक; ट्रक सोडून चालकाचे पलायन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११ ः तोंडवली-बोभाटेवाडी येथे चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरने मोटारीला दोनदा धडक दिली. या प्रकारानंतर ट्रकचालक ट्रक रस्त्यात सोडून जंगलात पळून गेला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र या प्रकारामुळे स्थानिकांचा राग अनावर झाला होता. हा अपघात आज सायंकाळी पावणे चारच्या सुमारास घडला. दारुच्या नशेत कोल्हापूरकडे होणाऱ्या चिरे वाहतुकीवर संबंधित विभागांचे कुठलेच नियंत्रण नसल्याची चर्चा यावेळी घटनास्थळी सुरू होती.
अधिक माहिती अशी की ः आज सायंकाळी एक ट्रक (केए २९- ६३३९) पावणे चारच्या सुमारास देवगडच्या दिशेने चिरे भरण्यासाठी जात होता. या ट्रकने फोंड्याकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच ४८ १२७९) तोंडवली-बोभाटेवाडी येथे अचानक धडक दिली व पळून गेला. त्यानंतर मोटार चालकाने गाडी वळवून त्या ट्रकचा पाठलाग केला. नांदगाव-मुस्लिमवाडीपासून काही अंतरावर ट्रकच्या पुढे गाडी थांबवून त्याला थांबण्याचा इशारा केला; मात्र ट्रक चालकाने मोटारीच्या दरवाजावर पुन्हा दुसरी धडक देऊन ट्रक तेथेच सोडून जंगलात धूम ठोकली. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झाले नाही; मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले. ही घटना समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोल्हापूरला होणाऱ्या चिरे वाहतूक चालकांना कुणाचाही धाक नसल्याचे बोलले जात होते.
.............
चौकट
कुणाचा अंकुशच नाही?
देवगड-फोंडा मार्गावर मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे चिरे वाहतूक सुरू आहे. चालक बेफाम गाडी चालवत असल्याने अनेक अपघात घडले; मात्र यावर संबंधित यंत्रणेचा अंकुश नसल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57198 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..