
मालवण येथे विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन
मालवण येथे विद्यार्थ्यांसाठी
करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ ः आपल्या पसंतीचे क्षेत्र निवडले, तर त्याचा कधी कंटाळा येत नाही. या सुटीत स्वत:शी संवाद साधा व स्वतःला काय आवडते, याचा शोध घ्या. तुम्हाला तुमची करिअरची वाट निश्चितच सापडेल, असे प्रतिपादन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी ''दहावीनंतरच्या वाटा'' या कार्यक्रमात टोपीवाला हायस्कूल येथे केले.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर पुढील जीवनात कोणत्या वाटेने जावे यासह आपल्याला हवे असलेले करिअर निवडताना त्या संदर्भातील प्रवेश परीक्षा, त्याचा अभ्यास, येणाऱ्या अडचणी यासंदर्भात मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी डॉ. मधुरा काटकर, प्रा. मैत्रेयी बांदेकर, विनिता पांजरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय जोशी होते. प्रास्ताविक ज्योती तोरसकर यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधींबद्दल डॉ. मधुरा काटकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. एमबीबीएसबरोबरच उपलब्ध असणाऱ्या इतर संधी, टेक्निशियनचा असणारा अभाव आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअर निवडताना आपण कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सायन्स फॅकल्टीमध्ये कोणते विषय उपलब्ध आहेत, ते निवडल्यानंतर विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रात कार्य करू शकतात, याची माहिती प्रा. बांदेकर यांनी दिली. आर्टबद्दल जे. जे. आर्टमधील विनिता पांजरी यांनी विद्यार्थ्यांना कलाक्षेत्र निवडल्यानंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन दर्शना प्रभू, ज्योती तोरसकर व नूरजहाँ नाईक या दहावीच्या वर्गशिक्षिकांनी केले होते.
...............
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57202 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..