
रत्नागिरी-जिल्ह्यात वीजचोरी नाही
L21122ः संग्रहीत
...
जिल्ह्यात वीजचोरी होत नसल्याचे स्पष्ट
भरारी पथकाचा निष्कर्ष; कृषी पंपाचा गैरवापर नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः कृषी पंपासाठी जर वीजमीटर घेतले असेल तर ते तुम्हाला शेतघर किंवा अॅग्रो टुरिझमसाठी वापरता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र वीजमीटर घ्यावा लागणार आहे. ज्या कारणासाठी वीजमीटर घेतला आहे, त्याच कारणासाठी ते वापरायचा आहे, अन्य कारणासाठी वापरल्यास तो कायद्याने गुन्हा आहे; मात्र अन्य जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात वीज चोरीच होत नसल्याचे महावितरणच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकांकडून सतत तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामध्ये कृषीपंपांचा गैरवापर झालेला नसल्याचे भरारी पथकाकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या ॲग्रो टुरिझम ही संकल्पना वाढत चालली आहे. बागायतीमध्ये पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध केली जाते. बागायतींसाठी कृषी पंप जोडणी असली तरी पर्यटनासाठी आवश्यक वीजजोडणी स्वतंत्र घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक हा निकष काटेकोरपणे पाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. भरारी पथक सतत कार्यरत असून, वीजमीटर फेरफार, वीजचोरी यावर छापा टाकला जातो. वीजमीटरमध्ये छेडछाड किंवा वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येते. सुरवातीला दंडात्मक रक्कम भरण्याची सूचना केली जाते. रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
काही शेतकरी शेतीपंपासाठी वीजमीटर घेतात; मात्र, त्याचा वापर बागेत असलेल्या घरासाठीही करतात, ते अयोग्य आहे. त्यासाठी स्वतंत्र वीजमीटर ग्राहकांनी घ्यावे. शेतीला पाणी मिळावे, यासाठी वीजजोडणी घेण्यात येते. अत्यल्प किमतीत ही जोडणी असल्याने गैरवापर ग्राहकांनी करू नये. भरारी पथकाच्या नजरेत ही गोष्ट आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. गैरवापर टाळून कारवाईही टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लांजा तालुक्यात शेतीपंपाच्या विजेचा गैरवापराचा प्रकार तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. बागेत उभारण्यात येणाऱ्या हॉटेलच्या इमारत बांधकामासाठी शेतीपंपाचा वापर केला जात असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले होते. कारवाई करून संबंधित ग्राहकांनी दंडात्मक रक्कम भरली होती.
--------------
कोट...
महावितरणचे भरारी पथक नेहमी कार्यरत असते. वीजमीटर छेडछाड, वीजचोरीच्या प्रकारांवर लक्ष ठेवून असते; मात्र, गेल्या दोन वर्षांत कृषीपंपांचा गैरवापर झाल्याचा एकही प्रकार आढळलेला नाही.
- एस. व्ही. कन्नमवार, भरारी पथकप्रमुख
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57208 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..