
राजापूर-आजिवली सरपंच रद्दच्या आदेशाला स्थगिती
आजिवली सरपंच रद्दच्या आदेशाला स्थगिती
ग्रामनिधीचा योग्य वापर नाही; विशाखा मोरेंना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील आजीवलीच्या सरपंच विशाखा मोरे यांचे सरपंच व सदस्यत्व रद्द करण्याबाबत विभागीय कोकण आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत आजिवली सरपंच विशाखा मोरे यांचे सरपंच व सदस्यत्व अबाधित राहणार आहे. त्याची माहिती अॅड. मिलिंद चव्हाण यांनी दिली.
आजिवली गावच्या सरपंच विशाखा मोरे यांना विभागीय कोकण आयुक्त यांनी गेल्या महिन्यामध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९.१ नुसार विद्यमान सरपंच यांना त्याच्या सरपंचपदावरून आणि सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीचे मुंबई लेखानियम २०११ नुसार त्यांनी निविदा न काढणे, ग्रामनिधीचा योग्य वापर न करणे, असा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय कोकण आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. विशाखा मोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे अपिल दाखल केले होते. त्यावर सविस्तर युक्तीवाद अॅड. मिलिंद चव्हाण यांनी केला. त्यानुसार १० मे २०२२ रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विभागीय कोकण आयुक्त यांच्या निकालास पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिल्याची माहिती अॅड. मिलिंद चव्हाण यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57217 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..