
एकसंघ राहून काम करा
swt११२७.jpg
२११२९
मालवणः तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
एकसंघ राहून काम करा
तहसीलदार अजय पाटणे ः मालवणात मान्सूनपूर्व व्यवस्थापनाचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः ''तोक्ते'' वादळात सर्वच विभागांनी सतर्क राहून एकसंघपणे काम केल्याने वादळाचा मोठा तडाखा बसूनही मदतकार्य व अपेक्षित काम शक्य झाले. येत्या पावसाळी काळातही सर्व विभागांनी सतर्क राहून एकसंघ काम करावे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मोबाईल २४ तास कार्यरत ठेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी तालुक्यातील सर्व विभागांना दिल्या. तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, आचरा पोलिस अधिकारी कुलदीप पाटील, नायब तहसीलदार श्री. कोकरे, आनंद मालवणकर तसेच विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महावितरणने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत माहिती तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे येथे द्यावी. ग्राहकांनी फोन केल्यास त्यांना सौजन्याने व योग्य माहिती द्यावी. वीज खांब व अन्य साहित्य उपलब्ध ठेवावे. बीएसएनएल विभागानेही सेवा खंडित होणार नाही, यासाठी तत्पर राहावे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडांची तोड तसेच अन्य उपाययोजना लवकर पूर्ण कराव्यात. पंचायत समिती विभागाने तालुक्यातील धोकादायक घरांची माहिती घ्यावी. आपत्ती काळात ज्या ठिकाणी स्थलांतराची गरज निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी स्थलांतर होणारी ठिकाणे शाळा अथवा अन्य इमारती सुस्थितीत ठेवाव्यात. पतन विभागाने अतिक्रमण बाधित किनारपट्टी भागात आवश्यक त्या ठिकाणी मोठे दगड, माती पोती भरून बंधारा अथवा अन्य सुरक्षित उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने साथरोग किट तसेच पुरेसा औषध साठ्यासह सर्प दंश, विंचू दंश यावरील औषधेही पुरेशी उपलब्ध ठेवावीत.
बंदर विभागाने भरती, ओहोटी वेळापत्रक प्रसिद्ध करावे. मुसळधार पाऊस, पूरस्थिती असल्यास व त्याच दिवशी उच्चतम भरती असल्यास त्याबाबत माहिती सर्व विभागांना आधी कळवावी. पर्यटन नौकाही बंद कालावधीत सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची पाहणी करावी. मत्स्य विभागाने ३१ पर्यंत सर्व मासेमारी नौका समुद्राबाहेर सुरक्षित स्थळी आल्या असल्याची नोंद घ्यावी. १ जूनपासून नौका बंदरात समुद्रात दिसल्यास कारवाई करून नौका बाहेर काढाव्यात, अशा सूचना मत्स्य विभागाला केल्या. ७ जूनपर्यंत समुद्रात गस्त सुरू ठेवून समुद्रात दिसणाऱ्या नौकांवर कारवाई केली जाईल, असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले.
तारकर्ली व सुकळवाड या दोन ठिकाणी मुख्य मार्गावर सुरू असलेले पुलाचे कधी पूर्ण होणार? असा सवाल तहसीलदारांनी बांधकाम विभागाला केला. यावेळी ३१ मेपर्यंत काम पूर्ण होईल, असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57221 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..