
रत्नागिरी ः महिला रुग्णालयातील 49 पदांवर कंत्राटी कर्मचारी
L21161ः संग्रहीत
...
महिला रुग्णालयात ४९ पदांवर कंत्राटी
भरतीचे आदेश; आरोग्य विभागाचे खासगीकरण शक्य?, इच्छुकांचा हिरमोड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर विभागात कंत्राटी तत्त्वावर आरोग्य कर्मचारी भरती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. यामध्ये १९६ पदाची भरती केली जाणार असून, यासाठी वाशी येथील खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील महिला रुग्णालयातील ४९ पदे तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी आरोग्य विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली; मात्र त्या परीक्षेच्या कालावधीत गोंधळ झाल्याने ती रद्द करण्यात आली. शासन पुन्हा परीक्षा घेऊन भरतीप्रक्रिया राबवेल, असे असतानाच आता कोल्हापूर विभागाने थेट कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय जाहीर करत कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे. कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरतीत उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर १० पदे, सांगली १० पदे, शिराळा १२ पदे, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इंचलकरंजी ८६ पदे, रत्नागिरी महिला रुग्णालय ४९ पदे, सावंतवाडी रुग्णालय ४ पदे, कणकवली ४ पदे, महिला बालरुग्णालय कुडाळ २३ अशा १९६ पदांचा समावेश आहे.
जिल्हा महिला रुग्णालयाला यापूर्वी नव्या शासकीय पदाना मंजुरी मिळाली होती; मात्र शासकीय भरती न करता आता कंत्राटी पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवली जात असल्याने इच्छुक उमेदावरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाचे खासगीकरण करणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
..
चौकट
शासनाशी थेट संबध राहणार नाही
शासनाने वाशी, नवी मुंबई येथील खासगी कंपनीला कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांना कंत्राट देताना घालण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोणत्याही क्षणी गदा येण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचा शासनाशी थेट संबध राहणार नाही, असे नमूद केले आहे. कंत्राटदार कंपनीसोबत केलेल्या करारात कोणत्याही क्षणी रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी कोणत्याही क्षणी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचा अधिकार कंपनीकडे दिला आहे.
----
चौकट
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे वगळली
कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी वगळता अन्य सर्व पदांचा समावेश आहे. अधिपरिचारिकांसह, रक्तपेढी तंत्रज्ञ, लिपिक, वाहनचालक, कक्षसेवक, औषधनिर्माण अधिकारी, मदतनीस, शिपाई या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57251 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..