
संक्षिप्त
आजगावात शास्त्रीय गायन स्पर्धा
सावंतवाडीः आजगाव येथील श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग व स्वयंभू कला-क्रीडा मंडळ यांच्यावतीने राधाकृष्ण चषक शास्त्रीय गायन व नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २८ व २९ मे रोजी आजगाव येथे श्री देव वेतोबा मंदिर सभागृहात दुपारी अडिच वाजता होणार आहे. शास्त्रीय गायन स्पर्धा २८ ला दुपारी होणार आहे. या स्पर्धेत १४ ते ४० वर्षे खुला गट-प्रथम ५५०१, द्वितीय ३५०१, तृतीय २५०१, उत्तेजनार्थ १५०१ व ११०१ तसेच अन्य आकर्षक बक्षिसे आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी विनायक दळवी, हेमंत दळवी, अविनाश शिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा. नाट्यगीत गायन स्पर्धा २९ ला लहान गट ८ ते १६ वर्षे-प्रथम ३३३३, द्वितीय २२२२, तृतीय ११११, मोठा गट-१७ ते ३५ वर्षे-प्रथम ५५५५, द्वितीय ३३३३, तृतीय २२२२ आदी बक्षिसे २१३६३ आहेत. इच्छुकांनी २० मेपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.
..............
''मोती तलाव पूर्णतः स्वच्छ करा''
सावंतवाडीः संस्थानकालीन सावंतवाडी शहराच्या मोती तलावातील शिव उद्यानाजवळील भागात गाळ साचला होता. तो काढण्याची मोहीम गेल्या शुक्रवारपासून सुरू केली होती. आणखी दोन दिवसांनंतर ही मोहीम थांबविण्यात येणार आहे; मात्र अर्धवट सफाई न करता पूर्ण तलावाची साफसफाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संपूर्ण मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढणे आवश्यक आहे. फक्त काही भागापुरता गाळ काढून साफसफाई मोहीम राबवू नये. संपूर्ण मोती तलावाची साफसफाई व गाळ काढणे आवश्यक आहे. आमदार दीपक केसरकर यांनी संपूर्ण तलावातील गाळ कसा काढता येईल, या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनालाही त्या दृष्टीने सूचना करणे गरजेचे आहे. तरच तलावाचे सौंदर्य फुलेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
...............
वर्धापन सोहळ्यास कुडाळात प्रारंभ
कुडाळः येथील श्री देवी कालिका मातेचा चौथा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यास आजपासून (ता. १२) प्रारंभ झाला आहे. त्या निमित्त १६ मेपर्यंत विविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १३ लाहरिपाठ, पुरुषोत्तम बुवा पोखरणकर, पोखरण यांचे कीर्तन व स्थानिक भजने, १४ ला हरिपाठ, रोहन बुवा पुराणिक, परुळे यांचे कीर्तन व भजन स्पर्धा होणार आहे. यात श्री समर्थ प्रासादिक कट्टा, श्री सनामदेव प्रासादिक सांगेली, श्री स्वामी समर्थ प्रासादिक कलंबिस्त, श्री महापुरुष प्रासादिक पिंगुळी यांचा समावेश आहे. १५ ला हरिपाठ, दत्तात्रेय बुवा उपाध्ये, वालावल यांचे कीर्तन व भजन स्पर्धा होणार आहे. यात श्री रवळनाथ प्रासादिक पिंगुळी, श्री निवजेश्वर प्रासादिक निवजे, श्री सद्गुरुनाथ प्रासादिक तुळस, श्री सद्गुरू प्रासादिक वडखोल यांचा समावेश आहे. १६ ला विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, हरिपाठ, स्थानिक भजने, नाट्य समर्थ गोरेगाव-मुंबई निर्मित ‘लॉटरी तिकीट’ एकांकिका, संगीत गायन, ओंकार दशावतार मंडळ, म्हापण यांचा ‘दिव्य तेजधारी भार्गव’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
..............
वडाचापाट येथे रेकॉर्ड डान्स
मालवणः भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट व सिद्धार्थ मंडळ बौद्धवाडीतर्फे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त १६ मे रोजी रात्री ९ वाजता वडाचापाट येथील समाज मंदिरात जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहा वर्षांवरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी संपर्क सचिन कासले संग्राम कासले यांच्याशी संपर्क साधावा.
................
केर शाळेची विद्यार्थिनी दत्तक
दोडामार्गः केर नं. १ शाळेतील एक विद्यार्थिनी आंबोली येथील डॉ. चंद्रकांत सावंत यांच्याकडून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेतून दत्तक म्हणून घेण्यात आली. याबाबतची घोषणा त्यांनी फरा प्रतिष्ठान सत्कार सोहळ्याप्रसंगी केली. आदर्श गाव केर येथील फरा प्रतिष्ठान सत्कार कार्यक्रमात केर नं. १ शाळेला सावित्रीबाई फुले दत्तक पालक दातृत्व मिळाले. यावेळी फरा प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मठ नं. २ वेंगुर्लेचे पदवीधर शिक्षक, भारत भूषण, राष्ट्रीयरत्न तसेच विविध गाव, राज्यस्तरीय ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकित सन्मानप्राप्त शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांना प्रदान केला. यावेळी डॉ. सावंत यांनी केर शाळेला तीन हजार रुपये दत्तक पालक योजनेंतर्गतची रक्कम शाळेचे मुख्याध्यापक सगुण कवठणकर, शिक्षक रामा गवस, केंद्रप्रमुख सदाशिव पाडगावकर तसेच फरा प्रतिष्ठानचे मान्यवर, सत्कारमूर्ती व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. मुख्याध्यापक कवठणकर यांनी फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच पुरस्कार समितीचे सदस्य तेजस देसाई व इतर सदस्यांसह डॉ. सावंत यांचे आभार मानले.
............
श्रावण येथे १६ ला त्रैवार्षिक गोंधळ
श्रावणः येथील श्री भवानी देवी मातेच्या मंदिरात परब कुटुंबीयांचा त्रैवार्षिक भवानी मातेचा गोंधळ सोमवारी (ता. १६) होणार आहे. यानिमित्त पहाटे ४ वाजता कुळी वाहणे, ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता श्री लिंगेश्वर पिंडीवर अभिषेक, श्री भवानी देवीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता चौडेश्वरी पूजा, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता जोगवा, रात्री ८ वाजता मांडाची पूजा, गाऱ्हाणे, मशाल पेटविणे, दिवटीत तेल घालणे, जागरण गोंधळ असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच शुक्रवारी (ता. २०) श्री ब्राम्हण देव मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा होणार असून, यावेळी सकाळी ८ वाजता पिंडीवर अभिषेक, दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसाद, रात्री ९ वाजता भजने होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन गावप्रमुख दुलाजी परब व श्रावण वरची परबवाडी, खालची परबवाडी यांनी केले आहे.
...............
संदीप भोसले यांची बदली
दोडामार्गः येथील पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांची स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. १३ जानेवारीला त्यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. या कार्यकाळात त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर बऱ्यापैकी अंकुश लावला होता.
..............
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57439 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..